कल्याण : येथील पश्चिमेतील उंबर्डे भागातील शेठ हिराचंद मुथा महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक व क्रीडा उत्सवात विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी अधिक प्रमाणात सहभाग दाखवून विविध कलांचे सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध प्रकारची आपल्यातील सांस्कृतिक, क्रीडाविषयक कौशल्ये सादर करून उपस्थितांकडून प्रशंसा मिळवली.

महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या सांस्कृतिक, क्रीडा उत्सवाचे उद्घाटन मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य अनुजा ब्रह्म, आयक्यूएससी समन्वयक अजय पिल्ले उपस्थित होते. सांस्कृतिक विभागात विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य, लोकनृत्य, पेन्सिल कलाकृती सादरीकरण, आशय लेखन, जाहिरात कलाकृती सादरीकरण, कथाकथन आणि मेहंदी रेखाटन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लोकनृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भारतातील विविध प्रांतांमधील लोकपरंपरा व संस्कृतीचे रंगमंचावर विविध आविष्कारातून सादरीकरण केले.

पेन्सिल रेखाटन आणि लिप्पन कला विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्ये, कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा प्रभावी आविष्कार घडविला. आशय लेखन स्पर्धेत ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील आजचा युवक’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आधुनिक माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आणि युवकांची भूमिका, कृत्रिम प्रज्ञा शाप की वरदान यावर आपले विचार मांडले. ॲड मॅड सादरीकरणात विद्यार्थ्यांनी कल्पक, विनोदी आणि नावीन्यपूर्ण जाहिराती सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कथाकथन स्पर्धेत ‘एक घोडचूक माझ्या आयुष्याला दिशा देणारी’ या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध हावभावातून प्रभावी कथाकथन केले. मेहंदी स्पर्धेतही विद्यार्थिनींनी कलात्मक नक्षीकामातून आपली सर्जनशीलता दाखवून दिली. क्रीडा विभागात बुध्दिबळ, कॅरम आणि व्हाॅलिबाॅल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बुद्धिबळ आणि कॅरममध्ये विद्यार्थ्यांनी एकाग्रता, संयम व रणनीतीचे दर्शन घडविले, तर व्हॉलीबॉलच्या सामन्यांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.

कल्याणमधील मुथा कॉलेजमध्ये सांस्कृतिक, क्रीडा उत्सव; विद्यार्थ्यांकडून विविध कलांचे सादरीकरण (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना

विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती, संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या दृष्टीने या स्पर्धांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. या उत्सवामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांसोबतच क्रीडाकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि आयोजकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्साहाचे वातावरण होते. मुथा महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक व क्रीडा उत्सवाने ‘कला, क्रीडा आणि सर्जनशीलतेचा संगम’ घडवून आणत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे, असे मत मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी व्यक्त केले.