कल्याण – मागील पाच दिवसांच्या मुसळधार पावसामुळे माती भुसभुशीत झाल्याने गुरूवारी सकाळी कल्याण जवळील नेतिवली टेकडीवरील दरडीचा भाग अचानक कोसळला. या दरडीलगत असलेले घर यामुळे खचले आहे. नेतिवली टेकडीलगत कल्याण शिळफाटा रस्त्यावर मागील अनेक महिन्यांपासून खोदकाम दणदणाचे काम सुरू आहे. त्याचे हादरे बसून या भागातील घरांना तडे गेले आहेत. त्याचा फटका या भागातील टेकडी आणि घरांना बसून हे नुकसान झाले, अशी माहिती या भागातील रहिवाशांनी दिली.

नेतिवली टेकडीवर दरड कोसळलेल्या भागातील नदीम शेख या रहिवाशाचे घर यामुळे खचले आहे. घराचा जोत्या दरडीबरोबर खचल्याने घराचा काही भाग अधांतरी झाला आहे. ही माहिती मिळताच जे प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी आपत्कालीन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पहिले दरड कोसळलेल्या भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना केली. आपत्कालीन पथकाने दरडीचा काही भाग रस्त्यावर आल्याने तो बाजुला काढण्याचे काम केले. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी, नगरसेविका स्नेहल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही नगरसेविकांनी सांगितले, मुसळधार पाऊस सुूरू असला की नेतिवली टेकडी भागात नेहमी दरडी कोसळतात. त्यामुळे पालिकेकडून या भागातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्वसूचना दिलेली असते. मागील पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे टेकडीचा काही भाग भुसभुशीत झाला होता. मागील काही महिन्यांपासून या टेकडीच्या भागात मेट्रो मार्ग उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदकाम केले जात आहे. हे काम करताना भूस्तराला दणके बसतात. ते दणके आजुबाजुच्या वस्ती, डोंगराला बसतात. त्यामुळे ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून आपल्या घराला चिरा जात होत्या. त्यामुळे आपण घरात सावधपणे राहत होते. मागील काही महिन्यापूर्वीच आपण या घरात राहण्यास आलो आहे. मुसळधार पावसामुळे जमीन भुसभुशीत झाली. ती खचत गेल्याने ही दरड कोसळून आपल्या घराचा भाग कोसळला, असे घर मालक नदीम शेख यांनी सांगितले.

गेल्या वर्षी याच टेकडीवर मुसळधार पावसात दरड कोसळून मोठा दगड येऊन एका झोपडीला अडकला होता. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली होती. या टेकडीवर दरवर्षी झोपड्या वाढत आहेत. मतदार म्हणून या झोपडीधारकांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी पाहतात. त्यांना सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सुविधांचा पुरवठा करतात. त्यामुळे या टेकडीचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. पालिका प्रशासन या महत्वाच्या टेकडीकडे दुर्लक्ष करत आहे.