कल्याण – कल्याणमधील पत्रीपूल परिसरातील मुस्लिम समाज राहत असलेल्या सोसायट्यांमध्ये सोसायटी आवारात कुर्बानीला बंदी घालत पोलिसांनी गुरूवारी बकरी ईदच्या दिवशी या सोसायट्यांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला. त्यामुळे अनेक वर्ष सोसायटी आवारात बकऱ्यांची कुर्बानी देणाऱ्या मुस्लिम समुदायातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक वर्ष आम्ही सोसायटी आवारात शांततेत हा कार्यक्रम पार पाडतो. आणि गुरूवारी अचानक आम्हाला अशाप्रकारच्या कुर्बानीला पोलिसांनी बंदी घालून बंदोबस्त तैनात केला हे आश्चर्यकारक आहे, अशा प्रतिक्रिया या सोसायट्यांमधील रहिवाशांनी दिल्या.

मुंबई परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये हिंदु, मुस्लिम समाज एकत्रित राहतो. अनेक सोसायट्यांमध्ये अनेक हिंदु समाजातील नागरिकांनी सोसायटी आवारात, घरात मुस्लिम रहिवाशांच्या कुर्बानीला विरोध केला आहे. यामुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते असा विचार करून पोलिसांनी मुंबई परिसरातील काही सोसायट्यांमध्ये बुधवारपासून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कल्याणमध्ये अशी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पत्रीपूल भागातील सर्वोदय सृष्टी, रहेजा आणि परिसरातील काही सोसायट्यांच्या आवारात पोलिसांनी सकाळीच आपली गस्त वाढवली. सोसायटीची प्रवेशव्दारे फक्त सोसायटीतील रहिवाशांना जाण्यास मोकळी ठेवली.

कोणीही रहिवाशाने सोसायटी आवारात, घरात बकऱ्याची कुर्बानी करू नये अशा सूचना रहिवाशांना देण्यात आल्या. अचानक घडलेल्या या प्रकाराने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही कुर्बानीसाठी आणलेला बकरा हा शेतकऱ्याकडून खरेदी केलेला असतो. कुर्बानीनंतर आम्ही ती कुर्बानी आम्ही गोरगरीब लोकांना वाटतो. त्यामुळे यामध्ये आमचा कोणताही स्वार्थ नसतो. तीन दिवसाच्या अवधीत हे करावे लागते. त्यामुळे आम्ही सुट्टी घेऊन कुर्बानीसाठी सज्ज असतो.

आज अचानक आम्ही नमाज करून आलो आणि आमच्या सोसायट्यांच्या आवारात पोलीस, पोलीस पिंजरे उभे करून ठेवण्यात आले होते. आम्ही मोठा गुन्हा केला आहे, अशी परिस्थती होती. आम्ही कायदा सुव्यवस्था राखुन, शांततेने सर्व पार पाडत अचानक पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्ताचा पवित्रा घेतला हे अनाकलनीय होते, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

या हालचालींमुळे सोसायटीच्या आवारात कुर्बानीसाठी आणलेले बकरे सदस्यांनी बाहेर नेले. सोसायट्यांमध्ये हिंदु, मुस्लिम समाजाचे लोक राहतात. अनेकांना सोसायटी आवारात कुर्बानी आवडत नाही. वादाचे प्रसंग उद्भवू नयेत म्हणून आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून हा बंदोबस्त वरिष्ठांच्या आदेशावरून तैनात केला, असे गस्तीवरील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.