ठाणे : शिळफाटा आणि कल्याणफाटा परिसरातील एमआयडीसी जलवाहिनी मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी एमआयडीसी जलवाहिनी मार्गावर (पाईपलाईन रोड) वाहतूक बदल लागू केले आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत हा मार्ग एकमार्गी करण्यात आला असून, दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील महापे, वाशी आणि पनवेल परिसरात मोठे औद्योगिक क्षेत्र असल्याने डोंबिवली, कल्याण, शिळफाटा, दिवा, अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत परिसरातील हजारो कर्मचारी व वाहनचालक दररोज कल्याणफाटा येथील एमआयडीसी जलवाहिनी मार्गाचा वापर करून नवी मुंबईकडे प्रवास करतात. मात्र, हा मार्ग अरुंद असल्याने दोन्ही दिशेची वाहतूक एकाच वेळी सुरू राहिल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. या कोंडीचा परिणाम कल्याणफाटा आणि शिळफाटा येथील मुख्य रस्त्यांवरही होत असतो.

ही समस्या लक्षात घेऊन ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदलाबाबत अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, कल्याणफाटा येथून एमआयडीसी जलवाहिनी मार्गे महापे, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत जलवाहिनी मार्गाच्या कल्याणफाटा प्रवेशद्वारातून प्रवेश बंद असेल. या कालावधीत या वाहनांना कल्याणफाटा-शिळफाटा या मुख्य मार्गाचा वापर करून नवी मुंबईकडे जावे लागेल. तसेच, महापे (नवी मुंबई) येथून एमआयडीसी जलवाहिनी मार्गे कल्याणच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या

वाहनांना सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महापे येथील पुजा पंजाब हॉटेलजवळील प्रवेशद्वारातून प्रवेशबंदी असेल. या वाहनांना शिळफाटा-कल्याणफाटा मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा लागेल.