मागील काही दिवसापासून कल्याण-डोंबिवलीत वाढलेल्या सामूहिक गुंडगिरी विरोधात कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई केल्यानंतर आता कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी एका खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आणि सहभागी असलेल्या १२ आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. एकाचवेळी १२ आरोपींवर मोक्का लावण्याची कल्याणातील ही पहिलीच घटना आहे.

कल्याण-डोंबिवलीत चोरी, घरफोडी, मारहाण, रात्रीच्या सुमारास दंगल करणे, वाहनांची तोडफोड, आदी प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. विशेषत: कल्याण पूर्व भागात तर गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावगुंडांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. रस्त्यावर तलवारी, लोखंडी सळई, दांडके घेऊन फिरणे, बर्थडे पार्टी दरम्यान फायरिंग करणे आदी अनेक प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर डीसीपी सचिन गुंजाळ यांनी या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता कल्याणचे एसीपी उमेश माने-पाटील आणि डोंबिवलीचे एसीपी जय मोरे यांना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १४ एप्रिलला कल्याण पूर्वेत पडलेल्या दरोडा आणि मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी १२ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत यातील ८ आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे, तर उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या सर्व आरोपींविरोधात हत्या, अपहरण, खंडणी, चोरी, धमकवण्यासारखे गुन्हे दाखल आहेत.

प्रत्येक आरोपीविरोधात १२ ते १७ गुन्हे दाखल असल्याने हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व आरोपींविरोधात सामूहिक गुन्हेगारीविरोधी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आल्याचे एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले. यातील आठ आरोपिना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली आहे.