कल्याण – रेवदंडा येथील श्री डाॅ. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि कल्याण पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांच्यातर्फे रविवारी सकाळी कल्याण शहरात संयुक्तपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानचे सद्गुरू सदस्य आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी, अधिकारी असे एकूण ४५० स्वयंसेवक या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

रविवारी सकाळी साडे सात ते दुपारपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डाॅ. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नियमित शहर, ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबविली जाते. याशिवाय वृक्ष संवर्धन उपक्रम राबविले जातात. मुख्य महामार्ग, गावांतर्गत रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश नागरिकांना दिला जातो.

असाच कार्यक्रम रविवारी कल्याणमध्ये कल्याण पोलीस परिमंडळ तीन आणि श्री. डाॅ. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य यांच्या संयुक्त मोहिमेतून राबविण्यात आला. कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, साहाय्यक पोलीस आयुक्त, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे, ४० पोलीस अधिकारी, २१० अंमलदार, श्री. डाॅ. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानचे १७५ सद्गुरू सदस्य असे एकूण ४५० सदस्य या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

कल्याण पश्चिमेतील नवीन कल्याण भागातील खडकपाडा बेट ते बिर्ला महाविद्यालय रस्त्यावरील रस्ता दुभाजक, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, झाडांच्या बुंध्यांशी, रस्त्यावरील वाहनांखाली असलेला पालापाचोळा, झाडांची पाने यावेळी स्वच्छतेच्या माध्यमातून काढण्यात आली. शहराची सुरक्षितता पाहणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर स्वच्छतेसाठी उतरल्याने अनेक नागरिक स्वताहून या उपक्रमात सहभागी झाले होते. जमा झालेला कचरा संकलित करून तो पालिकेच्या कचराभूमीवर वाहनातून नेण्यात आला.

कल्याण डोंबिवली पालिकेने या विशेष स्वच्छता मोहिमेसाठी विशेष सहकार्य केले. घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी या स्वच्छता मोहिमेसाठी पालिकेची वाहने उपलब्ध करून दिली होती. नागरिकांनी गटसमुहाने अशाप्रकारे योगदान दिले तर शहर स्वच्छतेचे महत्व तळागाळातील नागरिकांना समजेल. प्रत्येक जण आपल्या घर परिसरात नियमित स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करील. शहर स्वच्छता करणे ही जशी पालिकेची जबाबदारी आहे. त्याच बरोबर त्याच्यापेक्षा अधिकची जबाबदारी ही नागरिकांचीही आहे. लोकसहभाग आणि पालिका, स्वयंसेवी संस्था यांनी संयुक्तपणे शहर स्वच्छतेच्या मोहिमा वेळोवेळी राबविल्या तर आपण शहर स्वच्छतेचे अनेक महत्वाचे टप्पे पार करून स्वच्छतेबाबतीत देशातील पहिल्या दहा क्रमांकामध्ये आपल्या शहराचे नाव झळकेल, असे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.