कल्याण : कल्याणमधील वालधुनी येथील शिवाजी नगर भागातील मारुती विहार गृहप्रकल्पात १५ वर्षांपूर्वी घर खरेदीचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व इतर तीन रहिवाशांची दोन विकासकांनी एकूण २१ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. रक्कम भरूनही आपणास घराचा ताबा मिळण्याची शक्यता नसल्याने फसवणूक झालेल्या घर खरेदीदाराने महात्मा फुले पोलीस ठाण्यात पाच दिवसांपूर्वी तक्रार नोंदवली.

ठाणे पोलीस आयुक्तालयात साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले सुरेश राठोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘आश्रय डेव्हलपर्स’चे भागीदार, परफेक्ट डेव्हलपर्सचे भागीदार लक्ष्मण गुजर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार पोलीस अधिकारी सुरेश राठोड यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपला पुतण्या प्रल्हाद राठोड यांना कल्याणमध्ये घर घ्यायचे होते. आपण त्यांना कल्याणमधील वालधुनी भागातील शिवाजी नगर गेंदराज वाडी, वालधुनी येथे परफेक्ट बिल्डर्सचे भागीदार लक्ष्मण गुजर यांचा मारुती विहार गृहप्रकल्प सुरू आहे. आपण तेथे एक सदनिका खरेदीसाठी नोंदणीकृत केली आहे.

पुतण्याची ओळख विकासक गुजर यांच्याशी करून दिली. त्यांनी एक सदनिका त्याला दाखवली. त्यानंतर १० लाख रुपये किमतीचा घर खरेदीचा व्यवहार ठरला. घर खरेदी निश्चितीसाठी विकासकाने सांगितलेल्या रकमा त्यांच्याकडे जमा केल्या. काही दिवसांनी पुतण्याला आर्थिक अडचण आल्याने त्याने ती सदनिका आपणास खरेदीसाठी सूचित केले. तशी माहिती आपण विकासकाला दिली. त्याच्या सदनिकेची उर्वरित रक्कम मी विकासकाकडे भरण्यास सुरूवात केली.

विकासक बदल

काही दिवसांनी विकासक गुजर यांनी आपणास आपला वालधुनी येथील मारुती विहार प्रकल्प कल्याणमधील कर्णिक रोडवरील आश्रय डेव्हलपर्स यांना विकसित करण्यासाठी दिला आहे. विकासक गुजर यांनी आपली आश्रय डेव्हलर्पसचे भागीदार मोईस जोजवाला, प्रशांत बालन यांच्याशी ओळख करून दिली. बालन यांनी आपण निश्चित केलेल्या सदनिकेची किंमत ठरलेल्या १० लाखाच्या किमतीपेक्षा ११ लाखाची असल्याचे सांगितले. त्यामुळे वाढीव एक लाख रुपयाची रक्कम आपण आश्रय डेव्हलर्पसकडे भरणा केली. प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी आपणाकडे एकूण तीन लाखाची मागणी झाली. तीही रक्कम आपण भरणा केली. आपणास घर ताबा पत्र विकासकाकडून मिळाले. आपण विकासकाकडे घराचे दस्त नोंदणीकरण करण्यासाठी तगादा लावला. ते टाळाटाळ करू लागले.

आश्रय डेव्हलपर्स, परफेक्ट डेव्हलपर्सच्या भागीदारांनी आपणास सांगितले, आपली सदनिका एका पतपेढीच्या नावे नोंदणीकृत आहे. ते नोंदणीकरण रद्द करण्यासाठी आपण पाच लाख रुपये भरणा करा. ते नोंदणीकरण रद्द झाले की आम्ही तुमचे नोंदणीकरण करून देतो. त्याप्रमाणे राठोड यांनी विकासकांकडे पाच लाख भरणा केले. अशाप्रकारे सदनिका खरेदीसाठी सुरेश राठोड यांनी एकूण १३ लाख रूपये विकासकांकडे भरणा केले.

फसवणूक उघड

पैशांचे सर्व व्यवहार पूर्ण करूनही दोन्ही विकासक आपणास सदनिका दस्त नोंदणीकरण करून देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे ते आपली फसवणूक करत असल्याची खात्री पटली. या दोन्ही विकासकांवर यापू्वी फसवणुकीचा महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच, निलावती भिवरकर यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे केलेल्या दाव्यावरून या दोन्ही विकासकांना दंड झाला आहे, असे आपणास समजले. मारूती विहार प्रकल्पात आपल्याप्रमाणे गणेश चौधरी, रेखा बाविस्कर, विनोद भोईर यांचीही घर खरेदीत फसवणूक झाल्याचे समजले. मारुती विहारमधील सदनिकांसाठी आपल्याकडून १३ लाख, इतर तीन जणांकडून ८ लाख ७२ हजार असे एकूण २१ लाख ७२ हजार घेऊन गृहप्रकल्प पूर्ण न करता आपली फसवणूक केली म्हणून राठोड यांनी तक्रारीत म्हटले आहे.