कल्याण : कल्याण, डोंबिवली परिसरातील भेसळयुक्तखवा, मावा, पनीर आणि बेकायदा औषधसाठा करणाऱ्या आस्थापनांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष लक्ष ठेवले आहे. दोन महिन्याच्या कालावधीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण शहरातून लाखो रूपयांचा भेसळयुक्त साठा जप्त केला. या प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच पथकाने कल्याण पूर्वेतील खडेगोळवलीतील प्रकाश पाॅलिक्लिनिकवर छापा टाकून १ लाख ३ हजार ६९० रूपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त करण्याची कारवाई केली.

रुग्णालये, दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या, बेकायदेशीर औषध विक्री व्यवसाय आणि नियमबाह्य पध्दतीने औषधांचा साठा करणाऱ्या आस्थापनांना वचक बसावा म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कल्याण-डोंबिवली शहरांकडे तपासणीसाठी आपला मोर्चा वळविला आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी आयुक्त मुंढे यांना निवेदन देऊन कल्याण डोंबिवली शहरात सुरू असलेल्या खाद्य पदार्थाच्या हातगाड्या, उपहारगृहातील अस्वच्छता, आईस्क्रिम, दुग्धजन्य पदार्थांची उघड्यावर विक्री, नियमबाह्य औषध साठा करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी निश्चित कारवाईचे आश्वासन आयुक्त मुंढे यांनी धात्रक यांना दिले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

कल्याण पूर्वेत कारवाई

कल्याण पूर्व भागातील खडेगोळवलीत मे. प्रकाश पॉलीक्लिनिक ॲन्ड हेल्थ हाॅस्पिटॅलिटीमध्ये मंगळवारी (२१ जुलै) अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक प्रकाश पाॅलिक्लिनिकवर छापा टाकला. या कारवाईत अधिकाऱ्यांनी लाखो रूपये किंमतीचा विनापरवाना औषधसाठा ताब्यात घेऊन त्याचे नमुने तपासणीसाठी शासनाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक परवाना नसताना औषधोपचार करणे आणि औषधांचा साठा करणे हा औषध व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० चा भंग असल्याने जप्तीची कारवाई केली. यावेळी १ लाख ३ हजार ६९० रूपये किंमतीचा साठा हस्तगत केला.

प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कायदेशीर कारवाई पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपासणीसाठी या साठ्यातील दोन वेगवेगळ्या औषधांचे नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे खडेगोळवली परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. परवाना नसताना औषधे विकणाऱ्या आणि रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा आस्थापनांनवर कठोर कारवाईचा धडाका यापुढेही सुरूच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तरसुदृढ आरोग्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे. े