Crime News Update: जुन्या वैमनस्यातून कल्याणमधील रेल्वेचे वाहनतळांचे कंत्राट घेणाऱ्या एका व्यावसायिकावर आधारवाडी भागात रात्रीच्या वेळेत सहा जणांनी हल्ला करून गंभीर त्यांना जखमी केले आहे. या गुन्ह्यात गंभीर जखमी व्यावसायिकाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रशांत देशमुख उर्फ पीडी यांच्यासह त्यांच्या सहा साथीदारांचा बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत उल्लेख केला आहे.
विशाल नायडू (३६) असे हल्ला झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ते कल्याण पश्चिमेतील गायकरपाडा भागात कुटुंबीयांसह राहतात. ते रेल्वेची वाहनतळाची कंत्राटे घेतात. विशाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत देशमुख उर्फ पीडी, प्रतिक ठाकरे, शुभम नाडे, सुजय कदम, अक्षय तेजी आणि दोन अनोळखी इसमांविरूध्द भारतीय न्याय संहितेच्या पूर्ववैमनस्यातून हल्ला करणे, मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणे या कलमाने गुन्हा दाखल केला आहे. विशाल यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर नऊ टाके पडले आहेत.
तक्रारदार विशाल नायडू यांनी तक्रारीत म्हटले आहे, की मागील सहा वर्षापासून आपण प्रशांत देशमुख यांना ओळखतो. ते रिअल इस्टेटचे काम करतात. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. सन २०२२ मध्ये प्रशांत यांचा मित्र प्रतिक ठाकरे यांनी माझा मित्र विशाल यांच्यावर हल्ला करून जखमी केले होते. त्यानंतर आपण प्रशांत देशमुख बरोबरचे बोलणे बंद केले होते. सोमवारी रात्री होळीच्या दिवशी रात्री अकरा वाजता आपण, माझा मित्र अनिकेत घरी होतो. त्यावेळी प्रशांत देशमुख यांनी अनिकेतच्या मोबाईलवर संपर्क केला.
विशाल नायडुला आपणास संपर्क करायला सांग असा निरोप दिला. आपण तात्काळ संपर्क केला. तेव्हा देशमुख यांनी मला उद्देशून शिवीगाळ सुरू केली. ‘तुला चरबी आलीय का. तु आमच्या पुढे जातोस का, तुला मारायला मी आज प्रतिकला पाठवतो’. अशी अरेरावी केली. यावेळी विशाल यांनी आपण भेटून हा विषय बोलू असे प्रशांतना सांगितले, तात्काळ भेट असा आग्रह देशमुख यांनी धरला. पण होळी असल्याने नंतर भेटू असे बोलताच देशमुख यांनी फोन बंद केला होता.
त्यानंतर रात्री साडे अकरा वाजता मी चायनिज आणण्यासाठी जात असताना आधारवाडी सर्कल येथे संदीप चायनिज सेंटरजवळ प्रशांत देशमुख यांच्यासाठी काम करणारे प्रतिक ठाकरे, शुभम नाडे, सुजय कदम, अक्षय तेजी आणि इतर दोन अनोळखी इसम तेथे उभे होते. प्रतिक ठाकरेने आपणास इशारा करून थांबविले आणि शिवीगाळ केली. त्याचा जाब आपण विचारताच त्याने जवळच पडलेला पेव्हर ब्लाॅकचा तुकडा उचलून तो आपल्या डोक्यात मारला. यावेळी शुभमने हातामधील चाकू जमलेल्या लोकांना दाखवून मध्ये कोणी पडले तर त्याला कापून टाकीन अशी धमकी देऊ लागला.
त्याच्यावेळी देशमुखच्या इतर साथीदारांनी मला मारहाण केली. हल्ल्यानंतर सहा जण निघून गेले. आपण पत्नीला बोलावून घेतले आणि तिच्या साहाय्याने आपणरुग्णालयात दाखल झालो. आपणास नऊ टाके पडले आहेत. आपणावर हल्ला करून आपणास हल्लेखोरांनी धमकी दिली म्हणून आपण ही तक्रार दाखल करत आहोत, असे तक्रारदार विशाल नायडू यांनी तक्रारीत म्हटले आहे. या हल्ला प्रकरणाची पोलीस दलात उच्चस्तरावर दखल घेण्यात आल्याची चर्चा आहे.
