कल्याण रेल्वे स्थानकात गवंडी काम करणारा एक कारागिर गेल्या काही दिवसांपासून कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांकडील मोबाईलच्या चोऱ्या करत होत्या. या गवंड्याला अटक करण्यात आली आहे. त्याकडून विविध कंपन्यांचे महागडे दीड लाख रूपये किमतीचे मोबाईल कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहेत.


शुभम अरूण सानप (२५) असे गवंड्याचे नाव आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. गवंडी कामानिमित्त तो पुण्या जवळील भोसरी गावाजवळ येऊन राहत होता. गेल्या दोन वर्षात मंदीच्या वातावरणामुळे घर बांधणी, बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने काम मिळत नसल्याने शुभम आर्थिक संकटात होता. झटपट पैसा मिळवून श्रीमंत होण्याची स्वप्ने तो पाहत होता. गवंडी काम सोडून तो मोबाईल चोरीकडे वळला होता, असे पोलिसांनी सांगितले.


कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार वरून लांबपल्ल्याच्या गाड्या सुटतात. कुटुंबीय हातात पिशव्या, मोबाईल असा जामानिमा प्रवाशांच्या हातात असतो. या संधीचा गैरफायदा घेत शुभमने कल्याण रेल्वे स्थानकात गडबडीत असलेल्या प्रवाशांच्या हातामधील मोबाईल चोरण्याचा धंदा सुरू केला होता. पुण्याला जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये चढत असताना एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला. या प्र‌वाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. अशाप्रकारे एक्सप्रेसमध्ये चढताना मोबाईलच्या वाढत्या चोऱ्या फलाट क्रमांक चारवर होत होत्या.


सीसीटीव्हीमध्ये या चोऱ्या कैद होत होत्या. आरोपी सराईत गुन्हेगार यादीतील नव्हता. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे आणि तपास पथकासमोर आरोपी पकडण्याचे आव्हान होते.


मोबाईल चोरण्यासाठी एक इसम कल्याण रेल्वे स्थानकात येणार असल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक दुसाने यांनी रेल्वे स्थानकावर सापळा लावला. ठरल्या वेळेत सीसीटीव्हीमध्ये कैद असलेला इसम रेल्वे स्थानकात येताच दुसाने यांच्या पथकाने त्याला घेरले. त्याची पळून जाण्याची धडपड अयशस्वी झाली. एक्सप्रेसमधील प्रवाशांचे मोबाईल हाच इसम चोरत होता. याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने शुभम आपले नाव असल्याचे सांगितले. चोरलेले मोबाईल तो अकोला येथे घऱी ठेऊन येत असे. ग्राहक मिळाला तर त्याची तात्काळ विक्री करत होता. असे चोरीचे नऊ मोबाईल शुभमकडून हस्तगत केले आहेत. त्याने कोणत्या मेल, एक्सप्रेसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरले याचा पोलीस तपास करत आहेत. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.