कल्याण – लोहमार्ग पोलिसांच्या मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पाळत ठेऊन मुंबई परिसरातील दोन गांजा तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे तीन लाखाचा गांजा हस्तगत करण्यात या पथकाला यश आले आहे.

अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंधक विभागाचे हवालदार मिलिंद पाटील यांच्या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अमील शकील मुल्ला (२७) आणि अहमद रजा उर्फ अम्मो रशीद कुरेशी (१८) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे मुंबईतील कफ परेड येथील डाॅ. आंबेडकर नगर भागातील बॅकबे डेपोच्या परिसरात राहतात. मुंबई लोहमार्ग पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक कल्याण रेल्वे स्थानक भागात गुरुवारी सकाळपासून गस्त घालत होते. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान या पथकाला दोन इसम कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसले.

त्यांच्याजवळील दोन पिशव्यांमध्ये काही संशयास्पद वस्तू असल्याचा संशय पोलीस पथकाला आला. पथकाने त्यांना घेरण्याच्या हालचाली सुरू करताच हे दोन्ही इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी त्यांच्या भोवतीचा फास आवळला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुूरू केली. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या पिशव्यांची तपासणी सुरू केली. त्यावेळी दोघांच्या पिशव्यांमध्ये उग्र वास असलेल्या बोंडे, फळे, बिया, वाळलेली पाने आणि झाडाच्या वाळलेल्या काड्या दिसल्या. या सर्व वस्तू पुड्या करून बांधून ठेवण्यात आल्या होत्या. पिशव्या उघडताच पोलिसांना उग्र वास येऊ लागला. त्यावेळी यात अंमली पदार्थ असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तातडीने फोरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलवले. या पदार्थांची तपासणी केली. तो गांजा असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.

५२ हजार रूपये किमतीच्या पुड्यांप्रमाणे एकूण २ लाख ८६ हजार रूपये किमतीचा गांजा या दोन्ही तस्करांच्या पिशवीत आढळला. पोलिसांनी त्यांच्या गुन्हा दाखल करून चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांनी हा गांजा कुूठून आणला. तो ते कुठे विकणार होते. याचा तपास पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन कदम, हवालदार राम जाधव, गणेश महागावकर, मयुर पाटील, घार्गे, शिंदे, वळवी, फोरेन्सिक पथकाचे पूजा लोंढे, अनिता साबू सहभागी झाले होते.

कल्याण, डोंबिवलीतील स्थानिक पोलिसांनी अंमली पदार्थ तस्कर, सेवन करणाऱ्यांच्या विरूध्द जोरदार तपासणी मोहीम सुरू केली आहे.