कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक प्रवेशव्दारात प्रवाशांच्या जाण्याच्या मार्गात पाण्याच्या बाटल्या विक्री करणाऱ्या फेरीवाला महिलेला रेल्वे पोलिसांनी प्रवेशव्दारातून बाजुला होण्यास सांगितले. त्यावेळी ‘मी रेल्वे प्रवेशद्वारातून बाजुला हटणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही,’ असे आव्हान पोलिसांना देत फेरीवाला महिलेने उलट या महिलेला अटकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रेल्वे महिला पोलिसांना अश्लिल शिवीगाळ करत या महिला पोलिसांच्या सदऱ्याची गळपट्टी पकडून मारहाणीचा प्रयत्न केला.

रेल्वे पोलिसांचे १० जणांचे पथक, कल्याण डोंबिवली पालिकेचे क प्रभागाचे फेरीवाला हटाव नियंत्रण पथकाच्या समोर हा सर्व प्रकार मंगळवारी दुपारी साडेचार वाजता घडला. हवालदार पवार, मनीषा दिलीप कोठेवार या कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यातील महिला पोलिसाला फेरीवाला महिला यास्मिन मोहम्मद मुन्ना पठाण (३६, रा. मोबीन चाळ, सांगळेवाडी, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ) यांनी शिवीगाळ आणि महिला पोलिसाच्या गणवेशाची गळपट्टी पकडून मारहाणीचा प्रयत्न केला. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हवालदार कोठेवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फेरीवाली महिला यास्मिन यांच्या विरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हवालदार कोठेवार यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, मंगळवारी संध्याकाळी कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी गर्दीची वेळ झाल्याने लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे आणि पोलीस पथक फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी फलाट क्रमांक १ जवळील रेल्वे प्रवेशव्दारावर प्रवाशांच्या जाण्याच्या मार्गात गुन्हा दाखल यास्मिन पठाण फेरीवाला महिला पाण्याच्या बाटल्या रस्त्यात ठेऊन त्यांची विक्री करत होती. रेल्वे पोलिसांनी या महिलेला प्रवेशव्दारातून बाजुला होण्यास सांगितले. तिने पोलिसांचे ऐकले नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांदे यांनी पालिका क प्रभागाचे फेरीवाला हटाव पथकातील अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांना संपर्क केला. त्यांना कारवाईसाठी रेल्वे स्थानक भागात येण्याचे सूचित केले. कंखरे, संतोष मेंदे, चिंतन देढिया आणि इतर पाच कामगार तातडीने रेल्वे स्थानकाजवळ हजर झाले. त्यांनी रेल्वे पोलिसांच्या सूचनेप्रमाणे रेल्वे प्रवेशव्दार अडवून बसलेल्या यास्मिनला बाजुला हटविण्यास सांगितले. यावेळी यास्मिनने आक्रमक भूमिका घेत ‘मी येथून हटणार नाही. तुम्ही काहीही करा. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,’ असे आव्हान पालिका पथक आणि रेल्वे पोलिसांना दिले.

रेल्वे पोलिसांनी या महिले जवळील पाण्याच्या बाटल्या ठेवण्याचा मंच आणि त्यावरील बाटल्या बाजुला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी यास्मिन यांनी महिला हवालदार पवार यांच्या सदऱ्याची गळपट्टी पकडून त्यांना शिवीगाळ करत त्यांचे डोक्याचे केस ओढत त्यांना खाली पाडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर यास्मिनने हवालदार कोठेवार यांची गळपट्टी पकडून त्यांना अर्वाच्चा भाषेत शिवीगाळ केली. पोलीस, फेरीवाला हटाव पथकाला ही महिला फेरीवाला दाद देत नव्हती. या महिलेला लोहमार्ग पोलीस ठाण्यात येण्यास पोलीस पथकाने सांगितले. तरीही ती पोलीस ठाण्यात येण्यास तयार नव्हती. अखेर पोलीस अधिकारी कांदे यांनी पोलीस वाहन बोलावून घेतले. पोलीस पथकाने यास्मिनला ताब्यात घेतले. तिला पोलीस वाहनातून पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ, मारहाणीचा गुन्हा दाखल केला.