कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात झारखंडला चाललेल्या एका प्रवाशाच्या हातात प्लॅटफाॅर्म तिकीट ठेऊन, मी तुझे हावडा बंगाल येथील तिकीट काढले आहे. या तिकीट भाड्याचे ५०० रूपये झाले, असे सांगून प्रवाशाची लूट करून पसार झालेल्या चोराला रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी कल्याण रेल्वे स्थानकातूनच बुधवारी अटक केली आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

अतुल मोहन अडलिंगे (३२, रा. कासेगाव, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे. तक्रारदार सारीकुल शेख हा झारखंड जिल्ह्यातील पुकर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सध्या ठाणे हाजुरी दर्गा येथे मजुरीचे काम करतो. सारीकुलचे वडील खाणकामगार आहेत. सारीकुल याने तक्रारीत म्हटले आहे, की मी झारखंडला माझ्या मुळ गावी जाण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता कल्याण रेल्वे स्थानकात आलो. तिकीट काढण्यासाठी जाताना, एका व्यक्तीने किती वाजले, तु कोठे जात आहेस, अशी विचारणा केली. मी पश्चिम बंगाल हावडा येथे जात असल्याचे सांगताच, त्याने मी कोलकत्ता येथे चाललो आहे असे सांगितले. त्या इसमाने तिकीट मंचकावरून आपले ५०० रूपयांचे तिकीट मी न सांगताच काढून आणल्याचे सांगितले. आणि माझ्याकडे तिकिटाचे ५०० रूपये मागू लागला.

मी त्याला स्थानकाबाहेरील दुकानदारामार्फत ऑनलाइन व्यवहार करून ५०० रुपये दिले. त्यानंतर तिकिटावर पेनाने खाडाखोड केल्याचे दिसताच, फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यत चोर पसार झाला होता. स्थानकावर रेल्वे सुरक्षाबलाचे जवान भेटले असता त्याने घडला प्रकार सांगितला.

जवानांनी कल्याण रेल्वे स्थानकात त्या इसमाचा शोध घेतला. त्यावेळी तो इसम स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर दबा धरून बसल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याने आपण सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याने केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याची पोलिसांना कबुली दिली.