कल्याण – सकाळची वेळ आहे. मोबाईलमधील गाण्यांचा आवाज कमी कर, असे प्रेमाने आपल्या शेजारील सहप्रवाशाला सांगितल्याचा राग येऊन इंदौर दौंड एक्सप्रेसमधील एका प्रवाशाने सूचना करणाऱ्या प्रवाशाशी हुज्जत घातली. तू माझ्या मोबाईल मधील गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगणारा कोण, असे प्रश्न सूचना करणाऱ्या प्रवाशाला केले. सूचना करणारा प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकात उतरताच मोबाईलधारी प्रवाशाने फलाटावरील फरशीचा तुकडा उचलून तो सूचना करणाऱ्या प्रवाशाच्या डोक्यात मारून त्याला रक्तबंबाळ केले.
याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. राहुल सोनावणे (३२) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते मुळचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधारे गावचे रहिवासी आहेत. ते पुणे येथे एशियन पेन्टस कंपनीत नोकरीला आहेत. त्यामुळे नोकरीसाठी ते पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील केसनंद गावात राहतात. तक्रारदार राहुल सोनावणे आणि त्यांचे सहकारी उज्जैन येथे गेल्या आठवड्यात फिरण्यासाठी गेले होते. तेथून पर्यटन करून ते शुक्रवारी उल्हासनगर मधील आपल्या बहिणीच्या घरी इंदोर दौंड एक्सप्रेसन येत होते.
एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची खूप गर्दी होती. शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सिग्नल लागल्यामुळे एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरात येऊन थांबली. या कालावधीत राहुल यांचा एक सहप्रवासी मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी लावून ऐकत होता. कर्णकर्कश आवाजामुळे इतर प्रवासी त्रस्त होते. राहुल सोनावणे यांनी पुढाकार घेऊन त्या मोबाईलवर गाणे ऐकत असलेल्या प्रवाशाला मोबाईलमधील गाण्यांचा आवाज कमी कर अशी सूचना केली. त्यावेळी तू हे मला सांगणारा कोण, असा प्रति प्रश्न त्या प्रवाशाने केला. मी तुला प्रेमाने सांगतो. मी तुला काही वाईट बोललो नाही, असे राहुल सोनावणे त्या प्रवाशाला सांगत होते. त्यावेळी त्या मोबाईलधारी प्रवाशाने कल्याण रेल्वे स्थानक येऊन दे मग तुला मी बघतो, अशी धमकी दिली.
सिग्नल सुरू झाल्यावर एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक सहावर आली. त्यावेळी तो मोबाईलधारी प्रवासी अगोदरच एक्सप्रेसमधून उतरला होता. त्याने फलाटावरील एक फरशीचा तुकडा हातात घेतला होता. राहुल सोनावणे एक्सप्रेसमधून उतरताच त्या हुज्जत घालणाऱ्या प्रवाशाने हातामधील तुटलेला फरशीचा तुकडा राहुल यांना काही कळण्याच्या आता त्यांच्या डोक्यात मारला. राहुल रक्त बंबाळ झाले. राहुल यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारल्यावर तो प्रवासी पळून जाऊ लागला. पण राहुल यांनी पाठलाग करून त्याला पकडून ठेवले. तेवढ्यात पोलीस तेथे आले. त्यांनी पकडून त्याला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेले. राहुल यांना उपचारचासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले.
हर्षद सुदाम मोरे (२४) असे मोठ्या आवाजात मोबाईल गाणे वाजविणाऱ्या तरूणाचे नाव असल्याचे पोलिसांना समजते. तो इसम ठाणे कळवा येथील मनीषानगर जयभीमनगर दोन, तुळजाभवानी मंदिराच्या समोरील वस्तीत राहत असल्याची माहिती हर्षद मोरे यांनी पोलिसांना दिली. तो सफाई कामगार म्हणून काम करतो. राहुल सोनावणे यांना गंभीर दुखापत केल्याबद्दल हर्षद मोरे यांच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
