कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चारवर गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान विदर्भ एक्सप्रेसमध्ये घाईत चढत असताना ४५ वर्षाचा एक प्रवासी डब्याच्या पायरीवर पाय घसरून फलाट आणि डब्याच्या मध्ये घरंगळू लागला. तो घरंगळून डब्याखालुन रेल्वे मार्गात पडण्याच्या स्थितीत असताना, तो बचावासाठी ओरडा करत होता. ही बाब तेथे तैनात रेल्वे सुरक्षा बळाचे जवान गणेश नामदेव तारू यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी क्षणार्धात त्या घरंगळणाऱ्या प्रवाशाच्या दिशेने धाव घेऊन त्याचे हात पकडून त्याला फलाटाच्या दिशेने ओढुन त्याचा जीव वाचविला.

हा सर्व प्रकार फलाटावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रेल्वे सुरक्षा बळाचे जवान गणेश तारू यांनी जीवाचा पर्वा न करता त्या प्रवाशाच्या दिशेने धाव घेऊन धावत्या विदर्भ एक्सप्रेसच्या डब्याजवळ लटकणाऱ्या प्रवाशाला आपली ताकद लावून त्या प्रवाशाला फलाटावर एकट्याने ओढले. यावेळी काही क्षणाचा विलंब झाला असता तर तो प्रवासी फलाट आणि डब्याच्या पायदानाची पोकळीमधून रेल्वे मार्गात पडला असता असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले.

कृष्णा गणेश गवई (४५) असे अपघातामधून वाचलेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते वाशीम जिल्ह्यातील मोनोरा गावातील वसंत नगर भागाचे रहिवासी आहेत. ते कल्याण ते अकोला असा विदर्भ एक्सप्रेसने गुरूवारी रात्री प्रवास करणार होते. जवान गणेश तारू यांची कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार ते सहावर गुरूवारी रात्री कर्तव्य होते. ते आपले कर्तव्य पार पाडत असताना रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान विदर्भ एक्सप्रेस मुंबईहून कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर आली.

एक्सप्रेस निर्धारित वेळेत सुरू होऊन संथगतीने फलाट सोडून धावू लागताच, घाईघाईने एक प्रवासी फलाटावरून आपल्या वजनदार पिशवीसह विदर्भ एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागला. चढत असताना एक्सप्रेसने वेग घेतला होता. त्यामुळे त्याच्या खांद्यावर असलेली वजनदार पिशवी आणि गाडीचा वेग, त्याने एक्सप्रेसच्या दरवाजाच्या दांडीला पकडलेला हात यांचा समन्वय जुळून न आल्याने प्रवासी कृष्णा गवई तोल जाऊन फलाटाच्या दिशेने झेपावून घरंगळू लागले. ते बचावासाठी मोठ्याने ओरडा करू लागले.

जवान गणेश तारू यांना एक प्रवासी दरवाजाला लटकत असल्याचे दिसताच त्यांनी त्याच्या दिशेने धाव घेतली आणि जीवाचा पर्वा न करता धावत्या एक्सप्रेसमधील त्या घरंगळत असलेल्या प्रवाशाला फलाटाच्या दिशेने जोराने ओढले. तात्काळ इतर प्रवासी त्या प्रवाशाच्या दिशेने धावले. तोपर्यंत जवान तारू यांनी मोठे कर्तव्य पार पाडले होते.

ही माहिती कल्याण रेल्वे स्थानक मास्तर यांनी आपल्या वरिष्ठांना, रेल्वे सुरक्षा बळ प्रमुखांना दिली. या धाडसाबद्दल गणेश तारू यांचे आणि रेल्वे स्थानकातील प्रवाशांनी कौतुक केले.