कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या कामांसाठी रेल्वे स्थानक भागातील प्रवासी सेवेतील स्कायवाॅकची अनेक ठिकाणी तोडमोड करून ठेवण्यात आली आहे. ही कामे करताना अनेक ठिकाणी स्कायवाॅकवर वाहिका लोंबकळत असल्याचे दृश्य आहे. प्रवाशांना या वाहिकांखालून जाताना त्रास होत आहे. पाऊस सुरू असला की या वाहिकांवरून थेंबथेंब पडणारे माती मिश्रीत पाणी प्रवाशांच्या अंगावर पडते. एखादा प्रवासी हातात उंच वस्तू, छत्री घेऊन घाईत जात असेल तर प्रवाशाच्या स्कायवाॅकवर लोंबकळत असलेली वाहिका निदर्शनास नाही. तो प्रवासी छत्रीसह किंवा हातामधील वस्तूसह त्या वाहिकेजवळ अडखळतो. कल्याण रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना दररोज या लोंबकळणाऱ्या वाहिकांचा त्रास होतो.
स्कायवाॅकवर अनेक ठिकाणी वाहिकांची वेट्टोळी स्कायवाॅकच्या कठड्याला गुंडाळून ठेवण्यात आली आहेत. या स्कायवाॅकवर दिवसा, रात्री गर्दुल्ले, मद्यपी झोपलेले असतात. तसेच, याच भागात फेरीवाल्यांनी ठाण मांडलेले असते. त्यात लोंबकळणाऱ्या वाहिका. अशा अवघडल्या वाटेवरून प्रवासी दररोज स्कायवाॅकवरून येजा करतात. या लोंबकळणाऱ्या वाहिका संबंधित विभागाने योग्यठिकाणी गुंडाळून ठेवाव्यात. प्रवाशांना त्यांचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
अनेक जागरूक प्रवाशांनी स्कायवाॅकवरील लोंबकळणाऱ्या वाहिका, फेरीवाले, मद्यपी, गर्दुल्ले यांच्याविषयी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, रेल्वे प्रशासनाला मेल पाठविले आहेत. आपल्या तक्रारींची दखल घेण्यात येत नाही, असे प्रवाशांनी सांगितले. डोंबिवली शहरात फेरीवाल्यांविरूध्द आक्रमकपणे कारवाई पालिकेकडून सुरू आहे. मग पालिकेच्या क प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगार, या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई का करत नाही. पालिका मुख्यालयातील मध्यवर्ती फेरीवाला पथकाचे पथकप्रमुख राजू शेलार यांना हे स्कायवाॅकवर बसलेले फेरीवाले दिसत नाहीत का, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.
प्रतिक्रिया कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे मागील अनेक वर्ष सुरू आहेत. ही कामे आता इतक्या संथगतीने सुरू आहेत की आता बस्स. या भागातील आहे तो उड्डाण पूल सुरू करा आणि पुढची कामे थांबवा अशी बोलण्याची वेळ आली आहे. या कामांमुळे रिक्षा प्रवासी वाहतुकीसह इतर सेवा अनेक वर्षापासून विस्कळीत झाल्या आहेत. जागोजागी स्कायवाॅकची ठेकेदाराने मोडतोड करून ठेवली आहे. वरून जाणाऱ्या, भूमिगत वाहिका लोंबकळत आहेत. या सर्व प्रकाराने प्रवासी त्रस्त आहेत. लोक रिक्षा संघटना म्हणून तुम्ही तरी काही तरी करा असे प्रश्न करत आहेत. संतोष नवले कार्याध्यक्ष, रिक्षा चालक मालक असोसिएशन, कल्याण.
रिक्षेने कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत यावे तर पहिले रस्तोरस्ती वाहन कोंडीतून वाट शोधत जावे लागते. रेल्वे स्थानक भागात आले की रिक्षा, खासगी वाहने, बस यांच्या बरोबर खो खो खेळत मग रेल्वे स्थानकात प्रवेश करावा लागतो. प्रवाशांना मागील अनेक वर्ष भोगावे लागणारे हे दुष्टचक्र आता तरी संपेल की नाही. प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या यातनांचा थोडा तरी विचार करून कल्याण रेल्वे स्थानक भागातील संथगती स्मार्ट प्रकल्पाची कामे पूर्ण करावीत. – योगेश दळवी सामाजिक कार्यकर्ते.
