उल्हासनगर : बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर व विठ्ठलवाडीसह उपनगरीय रेल्वे व लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकांवर सध्या भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. स्थानकांवरील गर्दीच्या फलाटांवर या श्वानांचा वाढता मुक्त वावर प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून, आता रेल्वे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हा गंभीर प्रश्न निर्माण होऊनही रेल्वे प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप संतप्त प्रवाशांनी केला आहे.
नोकरदार वर्गाचे शहर म्हणून अंबरनाथ व बदलापूर शहराकडे पाहिले जाते. प्रवाशांची वाढलेली गर्दी, उपनगरी रेल्वेगाड्यांची कमी असलेली संख्या व त्यात आहे त्या रेल्वेगाड्या दररोज उशिराने धावत असल्याने प्रवाशांत संतापाचे वातावरण असते. त्यातच या सर्व स्थानकांवरील फलाट व पादचारी पुलांवर भटक्या श्वानांचे जणू राज्यच असल्यासारखे चित्र आहे.
प्रवाशांच्या गर्दीत हे श्वान सर्रासपणे वावरत असतात. कधी ते अचानक प्रवाशांच्या अंगावर धावून जातात, तर कधी एकमेकांच्या मागे धावताना प्रवाशांना धडकतात. अनेकदा फलाटांवर चालण्याच्या मार्गातच हे श्वान घोळक्याने झोपलेले असतात. त्यामुळे घाईगडबडीत रेल्वे गाडी पकडणाऱ्या प्रवाशांचा पाय पडून त्यांच्याकडून चावा घेतला जाण्याची मोठी भीती असते.

कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चार व पाच हे सर्वाधिक वर्दळीचे फलाट म्हणून ओळखले जातात. दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची स्थानकात गर्दी वाढली आहे. येथे उपनगरी रेल्वेगाड्यांसह लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस उभ्या केल्या जातात. त्यामुळे हजारो प्रवासी एकाच वेळी या फलाटांवर असतात. मात्र, येथेही भटके श्वान अक्षरशः प्रवाशांची दमछाक घडवतात. त्यामुळे या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होते आहे.
यापूर्वी प्रवाशाला चावा
यापूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकावर एका भटक्या श्वानाने एका महिला प्रवाशाला जबर चावा घेतला होता. या अनपेक्षित हल्ल्यामुळे त्या महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले होते. या घटनेनंतर तरी रेल्वे प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा होती. मात्र स्थिती आजही बदललेली नाही. बदलापुरपासून कल्याणपर्यंत सर्वच स्थानकांवर भटक्या श्वानांचा उच्छाद पाहायला मिळतो आहे. काही ठिकाणी खुद्द रेल्वे कर्मचारीच फलाटांवर या भटक्या श्वानांना खाद्यपदार्थ खाऊ घालत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. यामुळे या श्वानांचा फलाटांवर वावर आणखीनच वाढला आहे.
निर्बीजीकरणावर प्रश्नचिन्ह
स्थानिक नगरपालिका व महानगरपालिकांच्या श्वान निर्बीजीकरण व लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर यापूर्वीच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पालिकांचे दुर्लक्ष असले तरी, रेल्वे स्थानक परिसराची व तेथील प्रवाशांची सुरक्षितता ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. किमान रेल्वे प्रशासनाने तरी या समस्येचे गांभीर्य ओळखून यावर तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी आग्रही मागणी आता रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे.
कल्याणसारख्या स्थानकात रात्री उशिरा जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतात. त्यात भटक्या श्वानांमुळे फलाटाच्या मागच्या व कमी वर्दळीच्या भागात थांबणे जिकिरीचे वाटते. भटक्या श्वानांना फलाटावर येण्यापासून रोखले पाहिजे. – योगिता जगदाळे, प्रवासी.
