कल्याण: आपल्या हातातील काम करणाऱ्या एका पाॅईंटसमन महिला कर्मचाऱ्याला आपण व्हाॅट्स ॲपद्वारे चुकीचे संदेश का पाठवले. ही कार्यालयीन कामाची पद्धत आहे का, असे प्रश्न करत कल्याण रेल्वे स्थानकातील उपस्टेशन प्रबंधक आशुतोष रोहिणी कुमार (वय ५०) यांना मारहाण करणाऱ्या मनसेच्या मध्य रेल्वे कामगार संघटनेच्या तीन पदाधिकाऱ्यांविरूध्द रेल्वे अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेच्या मध्य रेल्वे कामगार संघटनेचे प्रथमेश चिंतामण म्हात्रे, नीलेश दत्तात्रय सावंत, संतोष मिश्रा अशी गुन्हा दाखल रेल्वे कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पाॅईंटसमन हा कर्मचारी वर्ग आपल्या अधिनस्त काम करतो. या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर नेमणे, त्यांना सुट्ट्या देणे हे आपले कर्तव्य आहे, असे तक्रारदार उपस्टेशन प्रबंधक आशुतोष कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे. उपस्टेशन प्रबंधक आपणास त्रास देतात अशी तक्रार पाईंटसमन महिला कर्मचाऱ्याने रेल्वे संघटनेकडे केली होती.

आशुतोष कुमार यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सोमवारी सकाळी आपण आपल्या कार्यालयात सकाळी कर्तव्यावर होतो. ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या कार्यालयात मनसे मध्य रेल्वे कामगार संघटनेचे प्रथमेश म्हात्रे, नीलेश सावंत व संतोष मिश्रा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या पाईंटसमन महिला कर्मचाऱ्याबरोबर आले. त्यांनी पाॅईंट्समन महिलेला २ मार्च २०२६ रोजी पाठवलेले व्हाॅट्स ॲप संभाषण दाखवून असे चुकीचे संदेश त्या पाईंटसमन महिलेला का पाठवले, असे प्रश्न विचारणे सुूरू केले.

मी काहीही चुकीचे केलेले नाही. कामाच्या निमित्ताने आमचे नेहमी व्हाॅटसपवर संभाषण होत असते, असे प्रथमेशसह तीन जणांना सांगताच, प्रथमेश यांना आपल्या बोलण्याचा राग आला. त्यांनी आपणास मारहाण सुरू केली. त्याबरोबर त्यांच्या इतर दोन साथीदारांनी आपणास मारहाण सुरू केली. आपणास कार्यालयात मारहाण केली जात आहे, हे लक्षात आल्यावर कर्तव्यावरील फलाटावरील तीन पोलीस आपल्या कार्यालयात आले. त्यांनी आपणास मारहाण करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तावडीतून सोडवले. आपणास मारहाण झाल्याने आपण पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी गेलो. तेथे आपणावर उपचार करण्यात आले. त्यानंतर आपण ही तक्रार करीत आहोत, असे उपस्टेशन प्रबंधक कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, कलम ३(५) अन्वये हा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.