कल्याण : डॉक्टरांना मारहाण करणारा रमेश सुकऱ्या म्हात्रे प्रकरणात यंत्रणांनी सबळ पुरावे जमा करून अधिक जलदगतीने तपास सुरू केला आहे. सोमवारी तपास यंत्रणांनी कल्याणमधील आधारवाडी तुरूंगात जाऊन रमेश म्हात्रेच्या आवाजाचे नमुने घेतले. डाॅक्टरांना मारहाण करत असताना रमेश म्हात्रेचा आवाज आणि सीसीटीव्ही चित्रीकरणात आलेला आवाज याचे निश्चितीकरण या आवाजाच्या नमुन्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे, असे या प्रकरणाशी संबंधित एका विश्वसनीय सुत्राने सांगितले.
कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे याप्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष लक्ष असल्याने या प्रकरणातील बारकावे गोळा करून संबंधितांचे जबाब घेण्याचे काम तपास अधिकारी करत आहेत. येत्या वीस दिवसांत प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला सरकारी पक्षाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे उपायुक्त झेंडे आणि त्यांचे पथक म्हात्रे प्रकरणात कुठेही कमी राहणार नाही अशा पध्दतीने काम करत आहेत. गेल्या आठवड्यात या तपासाचा भाग म्हणून मुंबईतून फोरेन्सिक तज्ज्ञ पथक कल्याणमध्ये आले होते. या पथकाने सलग आठ तास एकत्रित बसून शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना मारहाण झालेल्या कक्षातील सीसीटीव्ही चित्रणाचे पृथक्करण केले. या यंत्रणेशी संबंधित सर्व कर्मचारी, ठेकेदार, नियंत्रक यांचे जबाब तपास यंत्रणेने घेतले.माहिती संकलित केलेली माहिती सीलबंद करून सरकारी पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
मुक्काम आधारवाडीतच
कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने म्हात्रेला पंधरा दिवसापूर्वी ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ही कोठडी सोमवारी आणखी १५ दिवसांनी वाढविण्यात आली. त्यामुळे म्हात्रेचा मुक्काम सध्या आधारवाडी तुरूंगात असणार आहे. म्हात्रेच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने ६ ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे.
नगरसेवक थंड
प्रभागातील नागरिक नगरसेवकांकडे पालिका रुग्णालयातील तक्रारी, रुग्ण सेवेविषयी तक्रारी घेऊन आले की थेट पालिका डाॅक्टरांना थेट संपर्क करून कल्याण-डोंबिवली पालिकेतील नगरसेवक डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना संपर्क करून आपल्या मतदार नागरिकाला योग्यरितीने रुग्णसेवा मिळाली पाहिजे म्हणून आग्रही, होते. मात्र रमेश म्हात्रे मारहाण प्रकरणानंतर पालिका हद्दीतील अनेक नगरसेवकांनी मतदारसंघातील नागरिकाला थेट रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देत असल्याची माहिती आहे.
