कल्याण – कल्याण पश्चिमेत मुरबाड रोडवरील सिंडीकेट भागात बुधवारी रात्री सिगारेट ओढण्यावरून दोन गटात बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले. यामध्ये एका रिअल इस्टेट आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना चार जणांनी शिवीगाळ करत लोखंडी सळई, फायटर आणि ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
विवेक प्रमोद पाडळे (२२) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते कल्याणमधील वालधुनी भागातील छत्रपती शिवाजी महाराज नगर भागात राहतात. ते मालमत्ता, घर खरेदी विक्रीचे मध्यस्थ म्हणून काम करतात. पाडळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोहन राम, राहुल राम (रा. शांताबाई चाळ, शांती हिंदी हायस्कूल, वालधुनी, कल्याण), अभिषेक तिवारी (रा. आनंदवाडी, कोळसेवाडी, कल्याण), सुमीत राम (रा. कल्लू फॅब्रिकेशन समोर, वालधुनी, कल्याण पूर्व) यांच्या विरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाण्यातील माहिती अशी, की तक्रारदार विवेक पाडळे यांच्या वालधुनी भागातील घरासमोर गुन्हा दाखल इसम अभिषेक, रोहन, राहुल आणि सुमीत हे दररोज संध्याकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान सिगारेट ओढण्यासाठी उभे राहतात. सिगारेट ओढत असताना मोठ्याने गप्पा मारून तेथील वातावरण धुराने प्रदुषित करतात. या धुरामुळे दररोज तक्रारदार कुटुंब आणि परिसराला त्रास होतो.
या दररोजच्या त्रासामुळे पाडळे कुटुंब त्रस्त होते. त्यामुळे तक्रारदार पडाळे यांनी गु्न्हा दाखल इसमांना ‘तुम्ही येथे सिगारेट ओढू नका. त्याचा आम्हाला त्रास होतो,’ असे सांगितले. त्यावेळी गुन्हा दाखल इसमांनी राग येऊन ‘आम्ही येथेच सिगारेट ओढणार. आम्ही येथे गप्पा मारणार. आम्ही येथून हटणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे पडाळे यांना सांगितले. आणि त्यांना शिवीगाळ केली.
हा प्रकार पाहून पडाळे अस्वस्थ झाले. त्यांनी या तरूणांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा विचार केला. ते आपले साथीदार विशाल राय, तौसिफ सय्यद यांच्यासह महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जाण्यास निघाले. त्याची कुणकुण सिगारेट ओढणाऱ्या चारही इसमांना लागली. त्यांनी तक्रारदार विवेक पाडळे आणि त्यांच्या दोन्ही मित्रांना मुरबाड रस्त्यावरील सिंडिकेट नाका येथे रात्री १० वाजण्याच्या दरम्यान अडवले. त्यांनी पडाळे यांना शिवीगाळ करत सिगारेट विषयावरून भांडण उकरून काढले.
यावेळी आक्रमक झालेल्या गुन्हा दाखल रोहम राम याने हातामधील लोखंडी सळईने तक्रारदार पाडळे यांना मारहाण केली. या मारहाणीत वर्मी घाव बसल्याने तक्रारदाराच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. राहुल राम याने तक्रारदाराच्या सर्वांगावर फायटरने हल्ला करून त्याना गंभीर जखमी केले. अभिषेक तिवारी, सुमीत राम यांनी पाडळे यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी पाडळे यांना सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास पुढे आलेल्या त्यांच्या दोन्ही मित्रांना टोळक्याने मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
