कल्याण – कल्याण शहर परिसराची वाढती लोकसंख्या आणि लगतचे ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर तालुक्यांचा विचार करून मध्यवर्ती ठिकाण म्हणून कल्याण शहरात प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ठाणे, रायगड आणि पालघरसह अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना ठाणे, मुंबई प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून सेवा दिली जाते. वाढती लोकसंख्या आणि पासपोर्टसाठी वाढणारी मागणी लक्षात घेऊन कल्याण येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय स्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे आमदार कथोरे यांनी पत्रात नमूद केले आहे. दोन ते तीन जिल्ह्यांचा भार मुंबई, ठाण्यातील एक ते दोन कार्यालयांवर येत आहे. त्यामुळे कल्याण ते कर्जत, कसारा परिसरातील नागरिकांचा विचार करून कल्याण येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय तात्काळ सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार कथोरे यांनी केली आहे.

ग्रामीण भागाची सोय

कल्याण येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यास कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, नेरळ, कसारा आणि कर्जत परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या सर्व शहरे व तालुक्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ४० ते ४५ लाखांपेक्षा अधिक आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि शिक्षणाच्या वाढत्या संधींमुळे परदेशात शिक्षण, नोकरी, व्यवसाय, पर्यटन आणि वैद्यकीय उपचारांसाठी जाण्यासाठी पासपोर्टची मागणी सातत्याने वाढत आहे. या भागातील नागरिकांना पासपोर्ट संदर्भातील विविध कामांसाठी ठाणे किंवा मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे प्रवासाचा खर्च, वेळ आणि कामाचा दिवस वाया जातो. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, नोकरदार तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागतो, असे आमदार कथोरे यांनी म्हटले आहे.

पासपोर्ट कार्यालयाची गरज

कल्याणमधील पासपोर्ट कार्यालयामुळे नागरिकांचा वेळ व प्रवास खर्च वाचेल, पासपोर्ट अर्जांच्या जलद व कार्यक्षम प्रक्रियेला गती मिळेल, विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक आणि परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांना मोठा दिलासा मिळेल, ठाणे आणि मुंबई येथील विद्यमान पासपोर्ट कार्यालयांवरील ताण कमी होईल, वाढत्या लोकसंख्येला दर्जेदार व सहज उपलब्ध शासकीय सेवा मिळतील, भविष्यातील कल्याण महानगर क्षेत्राच्या प्रशासकीय गरजाही अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येतील.आमदार किसन कथोरे यांनी केंद्र व राज्य सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून कल्याण येथे लवकरात लवकर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय मंजूर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.