कल्याण – आपल्या मुलाला आम्ही इन्कम टॅक्स विभागात, नाशिकच्या आरोग्य सेवा विभागात नोकरीला लावतो असे सांगून उल्हासनगरच्या एका आर. टी. ओ. एजंटची लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्याने ११ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. गेल्या वर्षी हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर. टी. ओ. मध्यस्थ युसुफ लोटन पिंजारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले नाशिक येथील रहिवासी भरत अशोक देवरे, त्यांचे सहकारी बबन भाऊसाहेब गायकवाड यांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार पिंजारी कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभाग परिसरात मध्यस्ठ म्हणून काम करतात.
पिंजारी यांनी तक्रारीत म्हटले आहे, की आपला मुलगा वाणिज्य पदवीधर झाला आहे. आपण त्याला नोकरी मिळण्यासाठी प्रयत्नशील होतो. आपला जळगाव चाळीसगाव येथील भाचा मुस्ताक पिंजारी यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपणास सांगितले, की आपल्या गावातील संजय साळुंके हे सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या सोबत सैन्य दलातून निवृत्त झालेल्या भरत देवरे यांनी अनेक मुलांना नोकऱ्या लावल्या आहेत. देवरे हे नाशिक येथे राहतात.
आपण या माहितीमधून देवरे यांच्या संपर्कात आलो. देवरे यांना आपल्या मुलाला नोकरी हवी आहे याची माहिती मिळाल्यावर त्यांनी आपणास संपर्क केला. इन्कम टॅक्स विभागात सन २०२३ च्या प्रतिक्षा यादीतील उमेदवार भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. याठिकाणी मी आपले काम करून देतो त्यासाठी आगाऊ काही रक्कम द्यावी लागेल असे सांगून मी आज नाशिक येथून कल्याण मधील मुरबाड रस्त्यावरील श्रीदेवी रुग्णालयात येणार आहे.
आम्ही देवरे यांना भेटण्यासाठी सोबत दोन लाख रूपये घेऊन गेलो. त्यांनी नोकरी लावण्याचे खात्रीपूर्वक आश्वासन दिले. इन्कम टॅक्स विभागात लिपिक पदासाठी एकूण १६ लाख रूपये लागतात. पहिले आपण पाच लाख रूपये द्या आपले काम नक्की करतो, असे सांगून पैशांची मागणी केली. आपले नोकरीचे काम ९९ टक्के होईल असे सांगून देवरे यांनी कल्याणमधील वालधुनी भागात आपल्याकडून एकूण चार लाख रूपये स्वीकारले. आपली शैक्षणिक कागदपत्रे छाननीसाठी पाठविण्यात आली आहेत. उर्वरित पाच ते सहा लाखाची रक्कम तुम्हाला रोखीने द्यावी लागेल, असे देवरे यांनी सांगितले.
उर्वरित पाच लाखाची रक्कम घेऊन आम्ही देवरे यांच्यासह औरंगाबाद येथे गेलो. तेथील विमानतळासमोरील हाॅटेलमध्ये आम्हाला नेण्यात आले. तेथे आम्हाला बबन गायकवाड, मोरे यांची ओळख करून देण्यात आली. मोरे हे इन्कम टॅक्समध्ये नोकरीला आहेत असे सांगण्यात आले. तेथेच आपल्या मुलाची मुलाखत घेण्यात आली. आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. शासकीय वैद्यकीय तपासणीसाठी इन्कम टॅक्सचे पत्र देण्यात आले. आपण ५ लाख रूपये देवरे, गायकवाड यांना दिले. त्यानंतर वारंवार नियुक्ती पत्राची मागणी करूनही देवरे, गायकवाड यांनी आपल्या मुलाचे काम केले नाही.
आपल्या मुलाचे काम आम्ही नाशिक आरोग्य सेवा मंडळात करतो सांगुन आपल्या मुलाचे नाव ६५ क्रमांकावर आहे, असे सांगून आपणास बनावट प्रतिक्षा यादी पाठविण्यात आली. अशाप्रकारे आपणास नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून देवरे, गायकवाड यांनी आपणाकडून ११ लाख रूपये उकळून फसवणूक केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
