कल्याण : बदलापूर शहर परिसरात विद्यार्थ्यांची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कोणत्याही परवानग्या न घेता, शालेय बस वाहतूक नियमांचे उल्लंघन करून नियमबाह्यपणे रिक्षा, ओमनी, वीस आसनी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या १३ वाहनांवर कल्याण विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षकांच्या पथकाने बुधवारी दिवसभरात कारवाई करून एक लाख ३६ हजार रूपयांचा दंड या वाहन चालक, मालकांकडून वसूल केला.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी नसलेल्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बदलापूरमधील एका वाहन चालकाने वाहनातच एका बालिकेशी अश्लिल चाळे करून तिच्याशी गैरप्रकार केला होता. या प्रकाराने खळबळ उडून अशाप्रकारे विद्यार्थ्यांची नियमबाह्यपणे वाहतूक करणाऱ्या, शालेय बस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालक, चालकांवर कठोर कारवाईची मोहीम उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कल्याण विभागाने सुरू केली आहे. यापूर्वी अशाच प्रकारची वाहतूक करणाऱ्या तीसहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली होती.

काटेकोर तपासणी

तरीही, बदलापूर परिसरात नव्याने काही वाहन मालक आरटीओच्या परवानग्या न घेता शालेय विद्यार्थी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन बुधवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आरटीओच्या पथकांनी बदलापूर शहर परिसरात विविध रस्त्यांवर धावणाऱ्या शालेय विद्यार्थी वाहनांची तपासणी केली. हे वाहन मालक, चालक शालेय बस वाहतूक नियमांची अंमलबजावणी करतात की नाही. त्यांच्याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगींचे आवश्यक कागदपत्रे आहेत की नाही, वाहनातील आसनक्षमता आणि विद्यार्थी भरण्याचे प्रमाण, चालकाकडे वाहन अनुज्ञप्ती, नामपट्टी आहे की नाही, वाहनात विद्यार्थी सेविका, सेवक आहे की नाही याची तपासणी यावेळी करण्यात आली, असे आरटीओ अधिकारी बारकुल यांनी सांगितले.

या कारवाईच्यावेळी १३ वाहन चालकांकडे आरटीओच्या आवश्यक परवानगीचे कागदपत्रे आढळून आली नाहीत. शालेय बस वाहतूक नियमांचे या वाहन चालक, मालकांकडून उल्लंघन केले जात असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी पथकाने घटनास्थळीच या वाहन मालकाना दंड ठोठावला. मोटार वाहन शालेय बस वाहतूक नियमन २०११ चा नियम, मोटार वाहन कायदा १८८ च्या कायद्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली परिसरात नियमबाह्यपणे शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची भंबेरी उडाली आहे. कल्याण, डोंबिवली परिसरात अशाच प्रकारे आरटीओ पथकाने ही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन मालक, चालकांकडून शालेय बस वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते की नाही. त्यांच्याकडे आवश्यक परवाने आहेत की नाही याची तपासणी करून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई सुरू आहे. बदलापूर परिसरात अशी कारवाई करण्यात आली. कल्याण, डोंबिवली परिसरात ही कारवाई केली जाणार आहे. – आशुतोष बारकुल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी. कल्याण.