कल्याण – उच्च सुरक्षा वाहन नोंंदणी पट्टी वाहनाला बसवून घेण्याची मुदत ३१ जून २०२६ रोजी संपल्यानंतर कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने राज्य परिवहन विभागाच्या आदेशावरून कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील उच्च सुरक्षा वाहन नोंदणी पट्टी वाहनांवर नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाची वायुवेग पथके आणि मोटार वाहन निरीक्षक संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत.
तसेच, १ एप्रिल २०१९ पूर्वीची उपप्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी झालेली जी वाहने कल्याणमधील उंबर्डे येथील उपप्रादेशिक परिवहन विभागात प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी येतील त्या वाहनांची आवश्यक प्रक्रिया पार पाडून दिली जाईल. मात्र या तारखेनंतरची उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी नसलेली जी खासगी संवर्गातील वाहने योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रात पत्ता बदल करणे, वित्तीय बोजा चढविणे आणि उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र देणे, वाहनांमध्ये बदल करणे इत्यादीविषयक वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आवश्यक कामासाठी येतील.
त्यांनी उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी बसविल्याशिवाय त्या वाहन मालकांचे कोणतेही काम करून दिले जाणार नाही. उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी वाहन मालकांनी प्रथम बसवून घ्यावी आणि मगच आपली आवश्यक ती कामे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून करण्यात घ्यावी, असे कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितले. वाहने जप्त उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी नसलेली जी वाहने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाकडून जप्त करण्यात येतील.
ती वाहने आरटीओच्या कार्यालय परिसरातील वाहनतळावर आणली जातील. त्या वाहन मालकांनी तातडीने आपल्या वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी वाहनपट्टी बसवून घेतल्याशिवाय ती वाहन मालकांच्या ताब्यात देण्यात येणार नाहीत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी सांगितले. मागील दोन दिवसांपासून आरटीओची वायुवेग पथके कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, शहापूर परिसरात उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी वाहनांना बसवली आहे की नाही याची तपासणी आणि कारवाई करण्यासाठी फिरत आहेत. अशाप्रकारची अनेक वाहने जागोजागी कारवाई करून जप्त करण्यात आली आहेत, असे बारकुल यांनी सांगितले.
कल्याणसाठी सुविधा
कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी (एचएसआरपी) बसविण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागासाठी मे. रिअल माझाॅन इंडिया लिमिटेड एजन्सीची नियुक्ती केली आहे. वाहन मालक ही उच्च सुरक्षा वाहन पट्टी बसवून घेण्यासाठी ‘एचटीटीपीएस- एचएसआरपीएमएएचझेडओएनई२.ईन’ या नोंदणीकृत संकेतस्थळ, जुळणीवर नोंदणी करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी केले आहे. हे काम १ जानेवारी २०२५ पासून सुरू आहे, असेही ते म्हणाले.
उच्च सुरक्षा वाहनपट्टी वाहन मालकांनी आपल्या वाहनाला बसवून घेण्यासाठी परिवहन विभागाने वाहन मालकांना वेळोवेळी मुदती वाढून दिल्या, जानेवारी २०२५ नंतर ३० डिसेंबर २०२५ पर्यंत पहिली मुदतवाढ, त्यानंतर ३० जून २०२६ ची मुदतवाढ परिवहन विभागाने दिली होती. या कालावधीत ५० टक्के वाहन मालकांनी उच्च सुरक्षा वाहन पट्टी बसवून घेतल्याचे आढळले आहे. दोन वेळा मुदतवाढ देऊनही वाहन मालक आपल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी वाहन पट्टी बसवत नसल्याने आरटीओने ही वाहनपट्टी नसलेल्या वाहनांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे.
