Rickshaw License Verification RTO Kalyan: रिक्षा प्रवासी वाहतुकीचा परवाना घेण्यापूर्वी रिक्षा चालक बॅज मिळविण्यासाठी (पितळी वाहन क्रमांक) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन आपली महाराष्ट्रातील १५ वर्षाचा निवास, मालमत्ता कर, महावितरणची वीज देयके, उत्पन्न दाखला दाखल करतो. ही कागदपत्रे राज्याच्या विविध भागातील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच बारकाईने तपासली असती तर, आता जे रिक्षा आणि रिक्षा चालकांचे वारेमाप पीक मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह राज्याच्या विविध भागात आले आहे ते आलेच नसते, अशा प्रतिक्रिया रिक्षा वाहतूक प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

आता कोणत्याही रिक्षा चालकाने प्रवाशाबरोबर भाड्यावरून आणि अन्य काही कारणांवरून गैरवर्तन केले तर त्या एका रिक्षा चालकामुळे सरसकट सर्वच रिक्षा चालकांना नागरिक दोष देतात. गैरवर्तन करणारा रिक्षा चालक कोणत्याही रिक्षा चालक संघटनेचा सदस्य नसतो. त्याने नियमबाह्य कागदपत्रे तयार करून रिक्षेचा परवाना मिळवला असतो. झटपट पैसे कमवायचे असल्याने असे रिक्षा चालक मनमानी पध्दतीने रिक्षा प्रवासी वाहतूक करतात, असे रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जे रिक्षा चालक रिक्षा संघटनांचे सदस्य असतात. ते संघटनेशी बांधील असल्याने ते रिक्षा वाहनतळावरून शिस्तीने प्रवासी वाहतूक करतात.

बॅजपूर्वीच तपासणी

विविध प्रांतांमधून बेरोजगार तरूणांच्या फौजा महाराष्ट्रात विशेत मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल भागात दाखल होतात. आल्यानंतर ही मंडळी महसूल, शिधावाटप यंत्रणा, पोलीस विभागाशी संबंधित मध्यस्थी गाठतात. त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे ‘बिदागी’ देतात आणि महाराष्ट्रात राहत असल्याचे पाहिजे तसे कागदपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका काढुन घेतात. बेकायदा चाळीतील घर असले तरी त्याला जागा मालक पालिकेचा मालमत्ता कर लावून घेतो. ही सर्व कागदपत्रे घेऊन नुकताच महाराष्ट्रात दाखल झालेला परप्रांतीय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जातात. तेथे शासकीय शिक्का पाहून अधिकारी तात्काळ त्या इसमाला त्याची पोलीस चारित्र्य पडताळणी न करताच, त्याच्या कागदपत्रांची संबंधित विभागाकडून पडताळणी करून न घेताच, बॅज (रिक्षा चालविण्यासाठीचा पितळी पट्टीवरील क्रमांक) देतात.

हा बॅज देण्यापू्र्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २४ नियम आहेत. या नियमांचा रिक्षा चालकाने अभ्यास करून तशी उत्तरे परिवहन कार्यालयात देणे आवश्यक असते. या नियमावलीमुळे रिक्षा चालक महाराष्ट्रातील रहिवासी की परप्रांतामधील रहिवासी आहे हे उघड होते. या नियमावलीची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात फार दखल घेतली जात नाही. कर्मचारी टेबलाखालुन आपल्या समोरील रिक्षा चालकाला मराठी बोलता येते की नाही. तो खरच रिक्षा चालविण्यासाठी पात्र आहे का. तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे का. याची पडताळणी न करता मध्यस्थाने समोर ठेवलेल्या कागदपत्रांवर विश्वास ठेवतो. त्या रिक्षा चालकाला उपप्रादेशिक परिवहन कायार्लयातून रिक्षेचा परवाना आणि आवश्यक कागदपत्रे मिळाली की पुन्हा तो रिक्षा चालक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाय ठेवत नाही. हे भारंभार रिक्षा चालक अधिक झाल्याने शिस्तीने व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालक त्रस्त आहेत.

उमेदवार बॅज काढण्यासाठी आला की याचवेळी त्याची कागदपत्रे पडताळणी, त्याच्या मौखिक चाचणी कठोरपणे केली तर तो पहिल्याच फेरीत बाद होऊ शकतो. हे प्रकार यापुढे परिवहन विभागाने कठोर करावेत. तरच रिक्षांचे वारेमाप पीक थांबेल.-संतोष नवले कार्याध्यक्ष, रिक्षा चालक मालक युनियन, कल्याण शहर.

उपप्रादेशिक परिवहन विभागात महसूल, पोलीस, शिधावाटप विभागाचा एक कर्मचारी कायमस्वरुपी नियुक्त करावा. यामुळे जागीच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल. गैरगोष्टी थांबू शकतील.- शेखर जोशी पदाथिकारी, रिक्षा चालक मालक युनियन, डोंबिवली.

रिक्षा परवाना काढताना उमेदवारांच्या कागदपत्रांची यापुढे आरटीओने बारकाईने तपासणी करावी. त्याशिवाय त्याला परवाना देऊ नये. हे प्रकार आता गरजेचे आहेत.-दत्ता माळेकर जिल्हाध्यक्ष, वाहतूक सेल.