कल्याण : कल्याणमधील उंबर्डे येथील सुसज्ज उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या परिसरात सुसज्ज वाहन चाचणी केंद्र नसल्याने केंद्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या लगतच्या रस्त्यांवर चालविले जाते. या केंद्रावर पिण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह अशा अनेक असुविधा आहेत. वाहन चाचणीसाठी जाणाऱ्या नागरिकांना उन्हात उभे राहून चाचणी पूर्ण करावी लागते. त्यामुळे हे केंद्र तातडीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जागेत सुरू करावे, चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्याची मागणी होत असून दोन महिन्यांपासून परिवहन विभागाकडे तक्रार करत आहोत, पण त्याची दखल घेतली जात नसल्याने डोंबिवलीतील मोटार वाहन प्रशिक्षक संगीता माळेकर यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यवाहीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या उंबर्डे येथील तीन एकर जागे पैकी ८ हजार २२० चौरस मीटर जागेवर बांधकाम आहे. उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहन चाचणी केंद्रासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे वाहन चाचणी सार्वजनिक रस्त्यावर उघड्यावर घेतली जाते असे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे म्हणणे असेल तर मालकी हक्काच्या जागेतील अतिक्रमण महसूल, पालिका, पोलीस यांच्या साहाय्याने काढुन घेण्याची जबाबदारी ही उपप्रादेशिक परिवहन विभागाची आहे, असे तक्रारदार माळेकर यांनी म्हटले आहे.
अतिक्रमण हटवण्याची मागणी
– १० कोटी ४६ लाख २५ हजार ९४२ रुपये खर्च करून शासनाने उंबर्डे येथे सुसज्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारले आहे. या तीन एकर जागेचे संरक्षण करण्याची जबाबदारी परिवहन विभागाची आहे. आपल्या मालकीच्या जागेवर स्थानिक भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने पालिका, महसूल विभागाकडे पाठपुरावा करावा. आपली अतिक्रमित जागा मोकळी करून घ्यावी, अशी मागणी माळेकर यांनी केली आहे.
– नांदिवली येथे अत्याधुनिक स्वयंचलित चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. या अत्याधुनिक केंद्रासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, टिटवाळा येथील शेकडो महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांनी उन आणि पावसात रस्त्यावर उघड्यावर ताटकळत राहून मोटार वाहन चाचणी द्यायची का, असा प्रश्न माळेकर यांनी केला आहे.
७ सध्या त्या चाचणी केंद्राच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, बसण्यासाठी, सावलीची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. यामध्ये महिलांचे हाल होतात. ३ एकर जागेवरील अतिक्रमण तात्काळ निष्कासित करून, त्या आवारातच मोटार वाहन चाचणी घेण्यास सुरुवात करावी. सध्या आहे त्या ठिकाणी नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पिण्याच्या पाण्याची, फिरते स्वच्छतागृह आणि बसण्यासाठी व्यवस्था प्रशासनाने करण्याची मागणी होत आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या उंबर्डे येथील कार्यालयाच्या बांधिव क्षेत्राव्यतिरिक्त जागेत अतिक्रमणे आहेत. यासंदर्भात पालिका, महसूल विभागाला कळविण्यात आले आहे. तेथे आवश्यक सुनावण्या होऊन निर्णय मिळाल्यानंतर ही अतिक्रमणे पाडण्याचे काम पूर्ण केले जाईल.तेथे सुसज्ज मोटार वाहन चाचणी केंद्र सुरू केले जाईल.- आशुतोष बारकुल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
