कल्याण : कल्याण येथील श्री संत राममारुती समाधी संस्थानचा १०८वा पुण्यतिथी उत्सव रविवारपासून सुरू झाला आहे. शुक्रवारी या उत्सवात भक्तिमय वातावरणात सद्गुरु राममारुती महाराजांच्या आवडीचा पुरणपोळीचा नैवेद्य (महाभोग, पार) लावला गेला. शुक्रवारी सकाळपासूनच भाविकांची मंदिरात दर्शन व पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखविण्यासाठी अलोट गर्दी झाली.

ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरातून आलेल्या भाविकांकडून सुमारे चार हजार पुरणपोळ्यांचा नैवेद्य महाराजांच्या समाधीवर भाविकांकडून अर्पण करण्यात आला. कल्याणमध्ये रविवारपासून संत राममारूती समाधी संस्थानचा १०८ वा पुण्यतिथी कार्यक्रम सुरू झाला आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संस्थाने आठवडाभर आयोजित केले आहेत. शुक्रवारी समाधी संस्थान परिसर पुरणपोळ्यांच्या महाभोगामुळे पुरणपोळ्यांच्या दरवळाने व्यापून गेला होता.

भाद्रपद कृष्ण षष्ठीच्या शुभमुहूर्तावर सकाळी साडे सात वाजता संत राममारूती महाराजांच्या समाधीवर पंचामृत महाअभिषेक करण्यात आला. महाराजांचा अत्यंत आवडीचा पदार्थ असलेल्या पुरणपोळीचा भोग (नैवेद्य) लावण्यासाठी कल्याण, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

सकाळी १० पर्यंत आलेल्या भाविकांच्या पुरणपोळ्या एकत्रित करून महाराजांना सुमारे चार हजार पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. उत्सवाचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त ग्रंथाच्या १८ व्या अध्यायाचे सामुदायिक पठण पार पडले. शहापूर तालु्क्यातील सरळांबे येथील भाषाप्रभू कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील यांचे ओघवत्या वाणीतील कीर्तन रंगले. संध्याकाळी महाआरती झाल्यानंतर संपूर्ण मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघाला.

शनिवारी (३ ऑक्टोबर) सकाळी विष्णू सहस्त्रनाम, तुळशीपत्र अर्पण सोहळा, दुपारी दुर्गा सप्तशती पाठ आणि रात्री मंगळागौरी व भारुडाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजता मुख्य प्रयाणकाळ उत्सव व सायंकाळी पाच वाजता श्रींच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे.

पारंपारिक गणवेशात, पारंपारिक वाद्ये या मिरवणुकीत असणार आहेत. भाविक या मिरवणुकीत सहभागी असतील. सर्व भाविकांनी यापुढील धार्मिक कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी आणि इतर विश्वस्तांच्या पुढाकाऱ्याने हा उत्सव पार पडत आहे.