कल्याण – बहुतांशी विद्यार्थी अलीकडे मोबाईलमध्ये सर्वाधिक व्यस्त राहत आहेत. काही विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. यामुळे अनेक विद्यार्थी शाळा, अभ्यासापासून दुरावत चालले आहेत. आवश्यक प्रसंगी संवादासाठी असलेली ही मोबाईल सुविधा चांगली असली तरी त्याचा अतिरेकी वापर आपल्या जीवन वाटचालीत बाधा आणू शकते. त्यामुळे सोमवारी कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थी, शिक्षकांनी मोबाईल अतिवापर टाळण्याच्या प्रवृत्तीचे शालेय आवारातील होळीत दहन केले.
तसेच, पर्यावरणाचे संवर्धन करा, प्लास्टिकचा वापर टाळा, रंगपंचमी करताना नैसर्गिक रंगांचा वापर करा. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा. आपल्या रहिवास परिसरातील नदी, विहिरी, खाडी प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्या, असा संदेश सम्राट अशोक विद्यालयातील होळी दहनाच्या माध्यमातून विद्यार्थी, नागरिकांना देण्यात आला.
विद्यालयातील होळीच्या टोकाला मोबाईलचा अतिरेकी वापर टाळा प्रवृत्तीचा फलक लावण्यात आला होता. सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापिका विजया तांबे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी होलिका दहन करण्यात आले.
यावेळी मालवणी भाषेत सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गाऱ्हण घातले. ‘सम्राट अशोक विद्यालयातील लेकर गाऱ्हाने घालतात रे महाराजा. जो काय आमच्या लेकरांना मोबाईलचा नाद लागलोय तो नाद काढून घे महाराजा. घरी आणि शाळेत आम्ही अभ्यासातच दंग राहू रे महाराजा,’ अशा भाषेत मोठ्या आवाजात विद्यार्थ्यांनी होळीला गाऱ्हाणे घातले. शाळेच्या आवारात पटांगणात होळीला पेंढा, शेण गोवऱ्या, फुगे, रंगीत पताकांनी सजविण्यात आले होते. बालवर्ग, इयत्ता पहिली ते नववीचे विद्यार्थी या होळी दहन कार्यक्रमात सहभागी झाले होते. एका विद्याथ्याने मोठ्या आवाजात मी मोबाईलचा अतिरेकी वापर करणार नाही. मी शालेय अभ्यासाला सर्वाधिक पसंती देईन. घरातील आई वडिलांना सांगावे लागेल अशी मोबाईल बाबतची कोणतीही कृती मी करणार नाही. शाळेतील शिक्षकांना मोबाईलपासून दूर राहण्याचा दिलेला संदेश मी काटेकोरपणे पाळीन, अशी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.
अशाच प्रकारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी, पर्यावरणस्नेही होळी डोंबिवलीतील उंबार्ली गाव येथील विद्यानिकेतन शाळेच्या आवारात विद्यार्थी, शिक्षकांनी साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला नियमित शाळेत वाहतूक कोंंडी मुक्त वातावरणातून येता यावे आणि घरी जाता यावे यासाठी मोठ्या आवाजात गाऱ्हाणे घातले.
