ठाणे : होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या, मंगळवारी धुलीवंदन साजरी केली जाणार आहे. धुळवडीत रासायनिक रंग वापरून त्वचेला हानी पोहोचविण्याऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरणपूरक धुलीवंदन सण साजरा करावा असे आवाहन वारंवार केले जाते. या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण येथील सुभेदार वाडा विद्यालयात ‘नैसर्गिक रंगांची कार्यशाळा’ नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी बीट, पालक, गाजर, जास्वंद अशा विविध गोष्टींचा वापर करून रंग तयार केले.
वनशक्ती संस्था व सुभेदारवाडा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने सुभेदार वाडा विद्यालयात “नैसर्गिक रंगांची कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत वनशक्तीच्या प्रकल्प अधिकारी चित्रा म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना विविध नैसर्गिक घटकांपासून रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी बीट, पालक, गाजर, जास्वंद, गोकर्ण, हळद, गुलाबाची फुले, कांद्याच्या साली, झेंडूची फुले आदी नैसर्गिक वस्तूंपासून आकर्षक आणि सुरक्षित रंग तयार केले.
बाजारातील होळीच्या रंगांमध्ये आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक रसायने आढळतात. या रासायनिक रंगांमुळे त्वचेची ऍलर्जी, डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे विकार तसेच इतर गंभीर आजार होऊ शकतात. विशेषतः अशा रंगांमध्ये मरक्युरी सल्फाइट, कॉपर सल्फेट, लेड ऑक्साईड, ॲल्युमिनियम ब्रोमाइड आणि क्रोमियम यांसारखे धोकादायक घटक आढळतात. ही रसायने त्वचा, डोळे आणि श्वसन संस्थेला हानी पोहोचवतात तसेच पाण्याचे आणि मातीचे प्रदूषण वाढवतात, ज्यामुळे पर्यावरण व जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो.
या कार्यशाळेला सुभेदार वाडा कट्टा शाळेचे सरचिटणीस अर्जुन पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, नैसर्गिक रंगांचा वापर करून सुरक्षित व पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला.
नैसर्गिक धुळवड का साजरी करावी?
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना होळी आणि धुलिवंदन सणाचा खरा अर्थ समजावून सांगण्यात आला. होळी हा निसर्गातील विविध रंगांची उधळण करणारा आनंदोत्सव आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक, सुरक्षित व नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी साजरी करण्याचा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला.
