कल्याण – कल्याणमधील ६४ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक अशोक दीक्षित यांना श्रीलंका येथे झालेल्या जागतिक पाॅवरलिफ्टिंंग स्पर्धेत वजनी गटात दाखविलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल दोन सुवर्ण पदके मिळाली. जागतिक पाॅवरलिफ्टिंग संघटनेच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंका येथे ही पाॅवरलिफ्टिंग स्पर्धा तीन दिवस २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक असुनही वजनी गटात अव्वल कामगिरी केल्याबद्दल उपस्थितींनी समाधान व्यक्त केले.

वयाला हरवून ‘कणखर पुरुषा’ची दमदार कामगिरी

पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेतील डेडलिफ्ट स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि अन्य एका वजनी गटात त्यांनी सुवर्णपदकाची कामगिरी केली. जागतिक पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक अशोक दीक्षित यांनी दोन सुवर्णपदके प्राप्त करून जागतिक स्पर्धेत भारत देशाची शान उंचावली.
जागतिक पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग नोंदविल्यानंतर अशोक दीक्षित त्या दृष्टीने आपले प्रशिक्षक श्रीबास गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पाॅवरलिफ्टिंगचा सराव करत होते.

कल्याण पश्चिमेतील नमस्कार मंडळात ते मागील अनेक वर्ष क्रीडाविषयक आणि पाॅवरलिफ्टिंगचा सराव करतात. शालेय जीवनापासून त्यांना पाॅवरलिफ्टिंगची आवड होती. नोकरी करत असुनही आपल्या व्यायामात त्यांनी खंड पडू दिला नाही. आपले शरीर बांधूसद आणि पिळदार राहील यादृष्टीने त्यांनी आपली जीवनशैली ठेवली. त्यामुळे ६४ वर्षाचे असुनही ते आपल्या चेहऱ्यावर ज्येष्ठ नागरिक, वृध्दत्वाचा भाव न आणता नव्या उमद्या दमदार स्पर्धकाप्रमाणे या पाॅवरलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होतात.

मागील अनेक वर्षाच्या कालावधीत अशोक दीक्षित यांनी २०२ स्पर्धांमध्ये एकूण ११३ सुवर्ण, २४ रौप्य आणि २७ कास्य पदके पटकावली आहेत. त्यांच्याकडे एकूण विविध स्पर्धांमधील देश, विदेशातील एकूण १६४ पदके आहेत. एप्रिलमध्ये कल्याणमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरिय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत बेंच, प्रेस आणि डेड लिफ्ट स्पर्धेत अशोक दीक्षित यांनी एकूण तीन सुवर्ण पदके पटाकवली होती. या स्पर्धेत त्यांना कणखर पुरूष (स्ट्राॅग मॅन) किताब देऊन आयोजकांकडून गौरविण्यात आले.

अशोक दीक्षित कॅनरा बँकेत नोकरीला होते. ते बँकेतर्फे अनेक वर्ष राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्पर्धक म्हणून खेळले आहेत. सन २००२ मध्ये अर्जेंटिना येथे झालेल्या पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत अशोक यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

अशोक दीक्षित कल्याणचे मुळचे रहिवासी आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण सुभेदारवाडा शाळेत पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण मुलुंड काॅलेज ऑफ काॅमर्समध्ये पूर्ण केले. ते वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर पदवीधर आहेत. १९८१ पासून ते नमस्कार मंडळात श्रीबास गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पाॅवरलिफ्टिंगचा सराव करत आहेत.

पाॅवरलिफ्टिंग हाही आपल्या जीवनाचा भाग आणि आपला आवडता छंद म्हणून जोपासला आहे. त्यामुळे वयाचा विचार न करता ते विविध पाॅवरलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होतात. पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत ते पंच म्हणून कर्तव्य करतात. या स्पर्धेतील यशाबद्दल त्यांना कल्याण रत्न, चित्तपावन ब्राह्मण महासंघाने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

भारतामधील एकाच खेळात, एकाच व्यासपीठावर वडील आणि मुलगी सहा वेळा सहभागी झाल्याबद्दल त्यांची लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे.