Cyber Crime In Kalyan: पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्याने हल्ला केला होता. तो पाकिस्तानचा सैनिक होता. तो दहशतवादी होता. त्या दहशतवाद्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक आहे. त्या दहशतवाद्याने पैशांचे बेनामी संशयास्पद व्यवहार केले आहेत. त्यामुळे तुमचाही सहभाग या सर्व प्रकरणात आहे. तुमच्या बँक व्यवहारांची आम्हाला तपासणी करायची आहे, असे सांगून कल्याणमधील एका ८२ वर्षाच्या आजीकडून पाच भामट्यांनी गेल्या पाच दिवसांच्या कालवधीत एकूण ७३ लाख ३० हजार रूपये उकळले आहेत.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आजींनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. रोहिणी चंद्रकांत कुलकर्णी (८२) असे तक्रारदार आजींचे नाव आहे. त्या कल्याण पश्चिमेतील सिंडीकेट मुरबाड रस्त्यावरील एका गृहसंकुलात राहतात. ६ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत हा सगळा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रोहिणी कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की ६ एप्रिल रोजी मी घरी असताना मला विजय खन्ना नावाच्या इसमाने मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याचे इतर चार साथीदार आळीपाळीने तक्रारदार आपणास संपर्क साधून आम्ही तपास अधिकारी आहोत, असे दाखवून मला घाबरवत होते.

या पाच इसमांनी आजींना मागील पाच दिवसांच्या कालावधीत सांगितले, की एक सीमकार्डधारक आहे. तो पाकिस्तानचा फौजी आहे. पण तो दहशतवादी आहे. त्यानेच पहलगाम येथील हल्ला केला आहे. या दहशतवाद्याने काही संशयास्पद बेनामी गैरव्यवहार केले आहेत. या व्यवहारांमध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाचा समावेश आहे. त्यामुळे तुमचाही या सर्व संशयास्पद व्यवहारांमध्ये संबंध आहे.

आम्ही या सर्व बेनामी व्यवहारांचा तपास करत आहोत. या प्रकरणात तुमचेही बँक व्यवहार आम्हाला तपासायचे आहेत असे खोटे सांगून या पाचही भामट्यांनी रोहिणी कुलकर्णी यांना त्यांच्या वेगवेगळ्या बँकांचे तपशील व्हाॅट्सप केले आणि त्या बँक खात्यावर टप्प्याने या भामट्यांनी सांगितलेल्या रकमा पाठविण्यास सांगितल्या. पाच दिवसांच्या कालावधीत कुलकर्णी यांच्याकडून आरटीजीएस, ऑनलाईन माध्यमातून एकूण ७३ लाख ३० हजार रूपये उकळले.

हा विषय रोहिणी कुलकर्णी आपल्या नातेवाईकांना सांगितल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीस निरीक्षक विजय नाईक याप्रकरणाचा तपास करत आहेत.