कल्याण – कल्याण शहरात गेल्या सात दिवसांच्या कालावधीत तीन आजी, आजोबांना तुम्ही गैरव्यवहार केले आहेत. तुमचे बँक व्यवहार संशयास्पद आहेत. तुम्ही दहशतवाद्यांच्या संपर्कात आहेत, अशी भीती घालून भामट्यांनी ऑनलाईन माध्यमातून कोट्यवधी रूपयांची लूट केली आहे. या घटना ताज्या असतानाच आता कल्याण पश्चिमेतील टिळक चौकातील मुरलीधर आळीतील एका ७५ वर्षाच्या आजोबांना एका भामट्याने गेल्या वर्षी २५ लाखाचा गंडा घातला आहे. आता हा गुन्हा दाखल झाला आहे.

बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम प्रभाकर मुजुमदार (७५) असे फसवणूक झालेल्या आजोबांचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय पिसे नावाच्या इसमा विरूध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याने गु्न्हा दाखल करून घेतला आहे. ऑक्टोबर २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

फसवणूक झालेले श्रीराम मुजुमदार यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपणास गुन्हा दाखल इसम संजय पिसे याचा फोन आला. त्याने आपणास आपण काही व्यवहार केले आहेत. त्याची माहिती पाठवतो असे सांगितले. पिसे नावाच्या त्या अनोळखी इसमाने मुजुमदार यांना कॅनरा बँकेचे विविध व्यवहारांचे एक स्टेटमेंट पाठवले.

या व्यवहारात एकूण दोन कोटी रूपयांची रक्कम आढळून येत होती. ही गैरव्यवहाराची रक्कम आहे असे पिसे यांचा आरोप होता. या रकमेतील २० लाख रूपये आपण तपासणीचा भाग म्हणून रिझर्व्ह बँकेत सुरक्षेसाठी जमा करा. त्या व्यवहारांची आम्हाला तपासणी करायची आहे, असे पिसे याने मुजुमदार यांना सांगितले.

या बोलण्यावर विश्वास ठेऊन मुजुमदार यांनी समोरील अनोळखी इसमाने दिलेल्या ॲक्सिस बँकेच्या कोनान्की शाखेच्या बँक खात्यावर आपल्या कल्याण शहरातील कल्याण जनता सहकारी बँकेतील टिळक चौक शाखेतील बँक खात्यावरून एकूण २४ लाख ९५ हजार रूपये आरटीजीएस माध्यमातून पाठवले.

आपण हा व्यवहार केला आहे. याची माहिती कोणालाही सांगू नका, अशी तंबी पिसे याने मुजुमदार यांना दिली. आपण माहिती उघड केली तर आपणास पैसे परत मिळणार नाही या विचाराने तक्रारदार श्रीराम मुजुमदार यांनी ही माहिती कोणाला सांगितली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाठवलेले २४ लाख रूपये तपासून आपणास एप्रिल उजाडला तरी परत मिळत नाहीत म्हणून तक्रारदार यांना संशय आला. अनोळखी इसमाने आपली दिशाभूल करून आपल्याकडून रक्कम उकळून आपली फसवणूक केली म्हणून बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले याप्रकरणाचा तपास करत आहेत.