कल्याण – कल्याण पश्चिमेतील शंकरराव चौक एक ज्येष्ठ नागरिक पायी चालले होते. त्यावेळी एक इसमाने अचानक त्यांच्या जवळ येऊन आपण खूप जुने मित्र आहोत असा देखावा उभा करून, ज्येष्ठ नागरिकाशी सलगी करून त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज असा एकूण ५० हजार रूपयांचा ऐवज दिवसाढवळ्या लुटून नेला. फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरिक चिकणघर भागातील रहिवासी आहेत.
दोन भुरट्या चोरट्यांनी ही लुटमार केली. कल्याण, डोंबिवली शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हे भुरटे चोर पायी फिरत असतात. ते ज्येष्ठ नागरिक महिला, पुरूष यांना हेरतात. त्यांच्या गळ्याचा सोन्याचा ऐवज, जवळील पिशवीत पैसे आहेत का याची खात्री करून मग त्या ज्येष्ठाला आपली जुनी ओळख आहे असे दाखवून बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील किमती ऐवज काढुन घेतात. गेल्या आठवड्यात डोंबिवलीत कोपरमधील एका महिलेला दोन भुरट्यांनी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान लुटले होते. या महिलेच्या गळ्यात एक लाखाहून अधिक किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले.
कल्याण चिकणघर नामदेव पथ भागात कुटुंबीयांसह राहणारे मधुकर रावजी जगताप (७४) बाजारपेठेत खरेदीसाठी आले होते. अहिल्याबाई चौक ते शिवाजी चौक दरम्यान जात असताना शंकरराव चौक येथे त्यांना एका इसमाने पाठीमागून येऊन, काय तुम्ही पाहिले पण ओळख दिली नाही असे बोलून जगताप यांना रस्त्यावर थांबवले. वयामुळे या व्यक्तिला आपण ओळखत नसावेत असा समज करून जगताप त्या इसमाशी बोलत राहिले. त्या भुरट्या व्यक्तिने जगताप यांना भुरळ घालून त्यांच्या खिशातील पैशांचे पाकीट काढले. हाताच्या बोटातील अंगठ्या काढुन घेतल्या. हे पाकीट, अंगठ्या मी का घेऊन जाऊ. त्या मी तुम्हालाच परत करणार आहे, असे बोलत त्याने हातचलाखी करून जगताप यांच्या पाकिटातून काढलेल्या एक नोटेत पैसे आणि सोन्याची अंगठी गुंडाळली आणि त्यांच्या हातात टेकवली. ती पुरचुंडी जगताप यांनी आपल्या विजारीच्या खिशात ठेवली.
हा पैसे काढणे, अंगठी काढण्याचा प्रकार सुरू होता. तेव्हा एक इसम त्या भुरट्या इसमाजवळ आला होता. पण तो क्षणात तेथून निघून गेला होता. जगताप यांना आपण तुमचे पैसे, अंगठी परत केली असे दाखवून तो भुरटा तेथून निघून गेला. काही अंतर पुढे गेल्यावर मधुकर जगताप यांना संशय आला. त्यांनी आपल्या खिशात पैसे, अंगठी आहे की हे पाहिले. त्यावेळी खिशातील त्या नोटेत अंगठी, पैसे नव्हते. हा प्रकार पाहून जगताप यांना धक्का बसला. त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत घर गाठले. घडला प्रकार घरी सांगितला. त्यावेळी आपणास भुरट्यांनी लुटले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी जगताप यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
