कल्याण: कल्याण जवळील आंबिवली येथील बाळकृष्ण पेपर मीलच्या एका अधिकाऱ्याच्या वाहनावर शहाड येथे तीन जणांनी लोखंडी सळईने हल्ला करून, अधिकाऱ्याला बाळकृष्ण पेपर मीलमधील काम सोडून दे. या भागात तु परत दिसता कामा नये अन्यथा तुझ्यासह तुझ्या बोईसर येथील कुटुंबाला ठार मारू, अशी धमकी या हल्लेखोरांनी मीलमधील ६६ वर्षाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याला दिली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ला झाल्यानंतर रात्रीच्या वेळेत एका इसमाने ज्येष्ठ नागरिक अधिकाऱ्याला मोबाईलवर संपर्क करून ‘तु बाळकृष्ण पेपर मीलमध्ये अजिबात दिसता कामा नये. नाहीतर तुला मारल्या शिवाय आम्ही सोडणार नाहीत,’ अशी धमकी दिली आहे. या हल्ल्यावरून काही गुंड खंडणीसाठी हा प्रकार करत असावेत अशी चर्चा आंबिवली, मोहने भागातील नागरिकांमध्ये आहे.

प्रदीप रिंगासिया असे तक्रारदार अधिकाऱ्याचे नाव आहे. ते आंबिवली येथील बाळकृष्ण पेपर मीलमध्ये साहाय्यक प्रमुख या पदावर काम करतात. ते शहाड येथे राहतात. रिंगासिया यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी चार जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

रिंगासिया यांना फोन करून धमकी देणारा इसम हा मयुर गणेश शिंदे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तो मुंबईतील चेंबूर भागातील गौतमनगर भागात राहतो. तक्रारदार प्रदीप रिंगासिया यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात संध्याकाळच्या वेळेत बाळकृष्ण पेपर मीलमधून माझ्या मोटारीने घरी चाललो होतो. वाहनात आपला स्वंयपाकी प्रकाश पुरोहित होता. आपले वाहन दीप ज्योती सोसायटीजवळ वळण घेऊन हॅप्पी होम सोसायटीजवळून मंगेश प्लाॅटच्या मुख्य प्रवेशव्दारासमोरून जात असताना, अचानक आपल्या वाहनाच्या समोर तीन जण आले. त्यांच्या हातात लोखंडी सळई होत्या.

आपणास काही कळण्याच्या आत त्यांनी आपल्या वाहनावर हल्ला चढून वाहनाच्या दर्शनी आणि बाजुच्या दरवाजांच्या काचा फोडून टाकल्या. काचांचे तुकडे आपल्या अंगावर उडाले. आपणावर हल्ला होत असल्याचे लक्षात येताच आपण वाहन वेगाने पुढे नेले. पुढे जाऊन थांबलो. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. आपण थांबल्यानंतर तेथील एका सोसायटीतील सुरक्षा रक्षक आला. त्याने हे तीन इसम हातात लोखंडी सळया घेऊन या भागात दुपारपासून फिरत होत असल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती आपण तात्काळ खडकपाडा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांसोबत आपण पोलीस ठाण्यात आलो. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी आपल्या मोबाईलवर घरी असताना रात्रीच्या वेळेत चेंबूर येथून गणेश शिंदे याने संपर्क करून ‘तु उद्यापासून त्या कंपनीत दिसता कामा नये. तु आमच्या हातून थोडक्यात बचावला आहेस. परत तेथे तु दिसला तर तुझ्या सकट तुझ्या बोईसर येथे राहत असलेल्या कुटुंबाला ठार मारू’ अशी धमकी गणेशने प्रदीप रायसिया यांना दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. फरार आरोपींचा ते शोध घेत आहेत.