उल्हासनगर: कल्याण आणि उल्हासनगर शहरांना जोडणाऱ्या तसेच शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शहाड रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण आणि ठाकुर्ली ते म्ह सोबा चौक उन्नत मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेली आचारसंहिता संपताच ही कामे प्रत्यक्ष जमिनीवर सुरू होणार असून, यामुळे कल्याण, उल्हासनगर आणि डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण सुमारे ३५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यासाठीची निविदा प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे.

कल्याण-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर शहाड रेल्वे स्थानकाजवळ असलेला विद्यमान उड्डाणपूल सध्या केवळ दुपदरी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार या पुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी ३० मीटर, तर उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील बाजूची रुंदी ३६ मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना चार पदरी रस्ते तयार करण्यात आले आहेत, मात्र मुख्य उड्डाणपूल फक्त दुपदरी असल्याने या ठिकाणी अरुंद भाग तयार होऊन रोज भीषण वाहतूक कोंडी होते. एखादे वाहन पुलावर बंद पडल्यास अथवा उड्डाणपुलाची दुरुस्ती हाती घेतल्यास संपूर्ण वाहतूक ठप्प होते. त्यामुळे अनेकदा वाहनांच्या रांगा कल्याणमध्ये थेट प्रेम ऑटो, बिर्ला महाविद्यालयापर्यंत पोहोचते. हीच कोंडी फोडण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे आता एमएमआरडीएच्या माध्यमातून ३२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा १०९० मीटर लांबीचा पूल आता चार पदरी केला जाणार आहे.

सोबतच ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकापर्यंतच्या उर्वरित उन्नत मार्गाच्या कामालाही गती देण्यात आली आहे. ठाकुर्ली लेव्हल क्रॉसिंग ते मानपाडा चौकादरम्यान सुमारे ३६ कोटी रुपयांच्या निधीतून ३६० मीटर लांबीचा आणि ७.५ मीटर रुंदीचा उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत १०५० मीटर लांबीचा आणि ७.५ ते ८.५ मीटर रुंदीचा जोडरस्ता विकसित केला जाईल. परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीवर येणारा ताण आणि प्रवासातील विलंब कमी करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे कल्याण, उल्हासनगर, ठाकुर्ली आणि डोंबिवली परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. रस्त्यांची वाहतूक क्षमता वाढल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि इंधनाची मोठी बचत होईल. या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, आचारसंहितेचा कालावधी संपताच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याने स्थानिक नागरिकांमधून आणि वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.