कल्याण – कल्याण शहराजवळील मोहने ते मोहिली, कल्याण मुरबाड हमरस्त्यावरील रायते येथील जुना उड्डाण पूल, टिटवाळा येथील काळू नदीवरील रूंदे पूल मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून पाण्याखाली गेले. यामुळे मोहने ते मोहिली, रूंदे गाव, रायते गाव परिसरातील वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. शहापूर तालुक्यातील ढाढरे-शिरोशी गावांना जोडणारा उड्डाण पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

मोहिली परिसरातील नागरिकांना उल्हास नदीवरील मोहने मोहिली उड्डाण पूल हा मधला मार्ग म्हणून उपलब्ध होता. तो बंद झाल्याने परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्ते मार्गाने जावे लागत आहे. मोहिली गाव परिसरातील दूध विक्रेते, नोकरदार, शाळा, महाविद्यालयातील मुले, व्यापारी मोहिली उड्डाण पुलाने कल्याण शहरात रिक्षा, खासगी वाहने, दुचाकी, मोटारीने येत होते. परंतु, सोमवार सकाळपासून मोहिली उड्डाण पुलावरून पाणी वाहू लागल्याने नागरिकांनी पुलाचे पाणी दिवसभरात कमी झाले नाहीतर

कल्याण शहर परिसरात अडकून पडावे लागेल या भीतीने घरीच राहणे पसंत केले. आज शाळा, महाविद्यालयांना सु्ट्टी आहे. त्यामुळे या रस्त्यावरून धावणाऱ्या शालेय बस, विद्यार्थ्यांची वाहतूक आज पूर्ण बंद आहे.

सकाळीच मुंबई, ठाण्याकडे या भागातून नोकरीसाठी गेलेला नोकरदार मात्र दिवसभरात पुलावरील पाणी कमी झाले नाहीतर कल्याण शहरात अडकून पडणार आहे. तसेच, कल्याण शहरातील अनेक नागरिक मोहिली परिसरात कामासाठी जातात त्यांचीही पुलावरील पाण्याने अडचण झाली.

रूंदे पूल पाण्याखाली

टिटवाळ्याजवळील काळू नदीवरील रूंदे पूल सोमवार सकाळपासून मुसळधार पावसाने पाण्याखाली गेला. या पुलामुळे टिटवाळा ते रूंदे, फळेगाव परिसरातील सुमारे १० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. रूंदी पूल उंच करावा म्हणून परिसरातील नागरिकांची अनेक वर्षाची मागणी आहे. परंतु, या मागणीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, शासन अधिकारी लक्ष देत नसल्याने या पुलाच्या उंचीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. उल्हास खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने उल्हास, काळू नदी दुथडी वाहून लागल्या की रूंदे पूल पाण्याखाली जातो. हा पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांना आता कल्याण, टिटवाळामार्गे इच्छित स्थळी जावे लागणार आहे.

जुना रायता पूल पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे रविवारपासून रायते पूल पाण्याखाली जाण्याची चिन्हे होती. पुलाच्या काही इंच खालून पावसाचे पाणी वाहत होते. त्यामुळे धोका टाळण्यासाठी वाहतूक विभागाने रविवारी रात्रीच हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सोमवारी सकाळपासून जुन्या रायते पुलाच्या समतल पाणी वाहू लागल्याने या पुलाच्या दोन्ही बाजुला वाहतूक पोलिसांनी गस्त लावली आहे. वाहन चालकांना टिटवाळा मार्गे किंवा नवीन रायता पूलमार्गे प्रवास करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.

रायता येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जुन्या पुलापासून काही अंतरावर सरळ दिशेने सुमारे २५० फूट उंचीचा नवीन उड्डाण पूल बांधला आहे. त्यामुळे यापूर्वी जुन्या रायता पुलाच्या भागात अहिल्यानगर, जुन्नर, मुरबाडकडून येणारी आणि कल्याणकडून मुरबाडकडे जाणारी वाहने नवीन पुलावरून थेट प्रवास करत आहेत. महसूल विभागाच्या आपत्कालीन यंत्रणा या पुलाच्या परिसरात तैनात आहेत.

ढाढरे पूल पाण्याखाली

शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील ढाढरे-शिरोशी उड्डाण पूल शाई नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे ढाढरे, शिरोशी भागातील नागरिकांचा शहापूर तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. नदीच्या परिसरात अचानक पावसाचा लोंढा येण्याची शक्यता असल्याने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना मासे पकडण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी नदी परिसरात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत.