ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नसून, कायदेशीर कारवाईसोबतच पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या उपचारावरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. या घटनेत शिवसेनेचे( शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह काही जणांनी डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली. मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण-डोंबिवली शाखेने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणीही आयएमएकडून करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले,
“शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. “
“या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, ” असे त्यांनी स्पष्ट केले.
“एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी महापालिका रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे, ” असे आवाहनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
