ठाणे : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक शाखेचा मुंब्रा वाहतूक कक्ष व शीळ- डायघर पोलीस ठाणे यांनी मिळून कारवाई केली. खिडकाळीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३० वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

सोमवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कल्याण फाटा येथे विशेष मोहीम राबवण्यात आली. खिडकाळीहून कल्याण फाट्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावर अनेक वाहनचालक वाहतूक नियम मोडत असल्याचे निदर्शनास आले. काही चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीची कारवाई सुरू केली व नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ताब्यात घेतले.

या कारवाईत मोटार चालक, दुचाकी चालकांचा सामावेश आहे. केवळ दंड आकारण्यावर न थांबता धोकादायक पद्धतीने वाहन चालवून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधित चालकांविरोधात शीळ-डायघर पोलिस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंब्रा वाहतुक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अतुल आहेर यांनी दिली.

(कोट) वाहतुकीचे नियम प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे धोकादायक असून त्यामुळे वाहतुक कोंडी तसेच अपघात होण्याचीही शक्यता असते. नागरिकांनी स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन विरुद्ध दिशेने वाहतूक करणे टाळावे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतूक विभाग.