कल्याण – कल्याण शिळफाटा रस्त्यालगतच्या गटारांवर बेसुमार बेकायदा बांधकामे झाली आहेत. शिळफाटा रस्ता बांधताना अनेक ठिकाणी भराव करण्यात आले. त्याठिकाणी मोऱ्या बांधण्यात आल्या नाहीत. या रस्त्यालगतचे नैसर्गिक प्रवाह भरावांनी बंद करण्यात आले. या रस्त्यालगत असलेल्या नाले, गटारांची ‘एमएमआरडीए’, ‘एमएएसआरडीसी’कडून सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिळफाटा रस्ता थोडा पाऊस पडला तरी जलमय होत आहे, अशी तक्रार मनसेचे नेते राजू पाटील यांनी केली आहे.

शिळफाटा रस्त्याच्या मुंब्रा परिसरातील नाले, गटारांची ठाणे महापालिकेकडून योग्यरितीने सफाई करण्यात येत नसल्याने या भागातील गटारे, नाले पाण्याने तुंबून ते पाणी पाठीमागे येते. हे पाणी शिळफाटा रस्त्याच्या सखल भागात येऊन शिळ रस्ता पावसाच्या पाण्याने जलमय होत आहे. या मुख्य विषयांकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ नाही. शिळ रस्ता जलमय झाल की हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊन शेकडो नागरिकांचे हाल होत आहेत, अशी माहिती राजू पाटील यांनी समाज माध्यमातून दिली आहे.

बेकायदा बांधकामे

कल्याण शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी गटारे नाहीत. काही ठिकाणी गटारे आहेत. त्या गटारांवर भराव करून काही दुकानदारांनी स्थानिकांच्या मदतीने आपली दुकाने थाटली आहेत. आपण केलेल्या भरावामुळे गटाराचा प्रवाह बंद झाला आहे याची कोणतीही फिकीर या दुकानदार, स्थानिकांना नाही. या दुकानांच्या परिसरात गटाराचे पाणी वाहून आले की तेथून पुढे जाण्यास वाव नसल्याने हे पाणी शिळ रस्त्यावर येत आहे. स्थानिक पातळीवर वाद नको म्हणून शिळ रस्त्याचे नियंत्रक एमएसआरडीसी, एमएमआरडीए अधिकारी या बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करत आहेत, अशा तक्रारी आहेत.

विकासकांचे पत्रे रस्त्यावर

शिळफाटा रस्त्यावर काटई ते मानपाडा चौक दरम्यान अनेक विकासकांनी शिळ रस्त्याचा सेवा रस्त्याचा आठ ते दहा फुटाचा भाग आपल्या खासगी हद्दीत ओढून शिळफाटा रस्त्याला खेटून २० फूट उंचीचे पत्रे ठोकून आपली जागा बंदिस्त केली आहे. या विकासकांचे गृहसंकुलांचे बांधकाम आराखडे एमएमआरडीएकडून मंजूर झाले त्यावेळी या विकासकांनी रस्त्यालगत किती जागा सोडावी याचे नियोजन बांधकाम आराखड्यात आहे. तरीही त्या आराखड्याकडे दुर्लक्ष करून विकासकांनी रेटून शिळफाटा रस्त्यालगत पत्रे ठोकून रस्त्याच्या जागेवर कब्जा केला आहे. एमएमआरडीए, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना हा अडविलेला रस्ता दिसत असुनही ते या बंदिस्त केलेल्या पत्र्यांवर कारवाई का करत नाहीत. संबंधित विकासकांना कारवाईची तंबी का देत नाहीत, असे प्रश्न या कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

प्रवाशांना होणारा हा त्रास विचारात घेऊन यासंदर्भात एक कायदेशीर नोटीस ॲड. मंगेश कुसुरकर यांनी एमएमआरडीए, एमएसआरडीसीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपकडून आंदोलन

शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा चौकात मेट्रो उभारणीचे काम अतिशय संथगीतने सुरू आहे. चौकाच्या मध्यभागाचे हे काम मागील सहा महिन्यांपासून गती घेत नसल्याने या चौकात दररोज वाहन कोंडी होते. आता या चौकातील कोंडीचा शाळेतील मुलांना फटका बसू लागला आहे. या चौकात प्रवाशांना दररोज एक ते दीड तास रखडवावे लागते. मानपाडा चौकातील हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. काम सुरू असल्याने पर्यायी रस्ते मार्गाची या वाहनांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने मानपाडा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

हे काम विहित वेळेत पूर्ण केले नाहीतर मात्र याठिकाणी आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘एमएमआरडीए’ला दिला. या विषयात कोणीही राजकारण आणू नये, असेही नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सूचित केले.