डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावर उलटदिशा मार्गिकेतून येणाऱ्या दुचाकी, मोटार वाहनांमुळे सतत वाहतूक कोंडी होत आहे. सरळदिशा मार्गिकेत वाहने अडकलेली दिसली की वाहन चालक रस्ता दुभाजकातील वाटेतून उलटदिशा मार्गिकेत घुसून वाहन कोंडीतून पुढे येऊन सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो. ही वाहने मग सरळदिशा मार्गिकेतील वाहनांना अडथळा निर्माण करतात. सरळदिशा मार्गिका या उलटदिशेने आलेल्या वाहनांमुळे वाहन कोंडीत अडकते. या उलटसुलट दिशांंकडून येणाऱ्या वाहनांमुळे शिळफाटा रस्ता दिवसेंदिवस सर्वाधिक वाहन कोंडीत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.
कल्याण शिळफाटा रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत या उलटदिशा मार्गिकेतून येणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक, सतत वाहतूक नियमांचा भंग केला म्हणून वाहन परवाना निलंबित करण्याची कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली तर अशाप्रकारे उलटदिशा मार्गिकेतून येणाऱ्या वाहन चालकांना चाप बसेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या उलटदिशा मार्गिकेतून वाहने चालविणाऱ्यांमध्ये खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारी, दुचाकी स्वार आणि खासगी मोटारी यांचा सर्वाधिक समावेश आहे.
२०० जणांवर कारवाई
अशाप्रकारे उलटदिशा मार्गिकेतून वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत कोळसेवाडी वाहतूक विभागाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन सांडभोर यांनी सुमारे २०० हून अधिक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई आणि फौजदारी गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. अशाप्रकारे आपल्यावर कारवाई होऊ शकते याची जाणीव असुनही शिळफाटा रस्त्यावर वाहने घेऊन धावणारा वाहन चालक सततच्या वाहन कोंडीमुळे उलटदिशा मार्गिकेतून वाहने चालवून वाहन कोंडीत आणखी भर घालत आहे.
कोंडी सुरूच
बुधवारी संध्याकाळी कल्याण शिळफाटा रस्त्याच्या काही भागात नेहमीप्रमाणे वाहन कोंडी होती. समोर वाहतूक कोंडी दिसत असल्याने आपण कल्याण, डोंबिवली शहराकडे वेळेत पोहचत नाही हे दिसल्यावर अनेक मोटार चालकांनी आपली वाहने रस्ता दुभाजकाच्या मधून उलटमार्गिकेत आणून प्रवास सुरू केला. बाजुचा रस्ता मोकळा दिसत असला तरी या रस्त्यावर वाहने वाहतूक पोलिसांनी सुरळीत वाहतुकीसाठी काही अंतरावर रोखुन धरलेली असतात. आपल्या समोर दिसणारा रस्ता मोकळा आहे असा विचार करून वाहन चालक उलटदिशा मार्गिकेत शिरतो. वाहतूक पोलिसांनी एकदा वाहने सोडली की ही वाहने उलटदिशा मार्गिकेतून येणाऱ्या वाहनांमुळे अडकून पडतात. त्यामुळे उलटदिशा मार्गिका पण कोंडीत अडकते, असे प्रवाशांनी सांगितले.
रूंदीकरण करा
शिळफाटा रस्ता बाधितांना मोठा गाजावाजा करत खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मागील चार ते पाच वर्ष रखडलेला मोबदला जाहीर झाला. हा मोबदला तात्काळ शेतकऱ्यांना देऊन काटई ते खिडकाळी, देसाई गाव भागातील रखडलेले शिळफाटा रस्त्याचे रूंदीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यासाठी खा. डाॅ. शिंदे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. शिळफाटा रस्त्याच्या दोन्ही बाजुने अतिवेगाने येणारी वाहने खिडकाळी ते काटई दरम्यानच्या रखडलेल्या रस्ता रूंदीकरण भागात अडकून पडतात. त्यामुळे याभागात सतत वाहन कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी या रखडलेल्या भागाचे लवकर रूंदीकरणाचे काम ठेकेदाराने हाती घेण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. या कोंडीचा नोकरदार,शालेय बसना सर्वाधिक फटका बसत आहे.
सिग्नल सुरू
कल्याण फाटा रस्त्यावरील वाहतुकीत सुसुत्रता येण्यासाठी कल्याण फाटा चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर या चौकात येणारा ताण कमी होणार आहे. आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते या सिग्नलचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. अशाप्रकारचे वाहतूक सिग्नल पलावा चौक, काटई तिठा, मानपाडा तिठा, रिजन्सी अनंतम प्रवेशद्वार सुयोग हाॅटेल चौकात बसविण्याची प्रवाशांची मागणी आहे.
शिळफाटा रस्त्यावर वाहन चालक दररोज सर्रास वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालवितात. वाहतूक पोलिसांसमोर हे प्रकार सुरू असतात. गस्तीवरील वाहतूक पोलीस करतात काय. – महेंद्र पाटील स्थानिक रहिवासी.
