कल्याण – कल्याण पूर्व भागातील श्रीराम टॉकीज परिसरात गुरूवारी संध्याकाळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि भाजपा समर्थक कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेवक मधुर म्हात्रे यांना भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी मारहाण करून त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मधुर म्हात्रे किरकोळ जखमी झाले. त्यांचा भाऊ निलेश म्हात्रे गंभीर जखमी झाला आहे. एका खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी परस्पर विरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. हा हल्ला कल्याण पूर्वेतील नाना धर्माधिकारी उद्यानात दोन वर्षापूर्वी झालेल्या खून प्रकरणातील
प्रकरणातील मुख्य आरोपी आणि न्यायालयाने कल्याण शहरात प्रवेश करण्यास बंदी घातलेल्या आकाश जयस्वाल याने केल्याचा आरोप नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी केला. एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर आकाशने धारदार शस्त्राने हल्ला केला असल्याची माहिती आहे.
माजी नगरसेवकावर आरोप
नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी हल्लेखोर आकाश जयस्वाल हा भाजपाचे या भागातील एक माजी नगरसेवक यांचा समर्थक असल्याचा दावा केला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर आपणास संबंधित माजी नगरसेवक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जवळ करून असे हल्ले घडवत असल्याचा गंभीर आरोपही मधुर म्हात्रे यांनी केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांच्या तक्रारींवरून परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन तास ठिय्या
सार्वजनिक रस्त्यावर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना शिंदे गटातील नगरसेवकावर हल्ला झाल्याने महायुतीत बिघाडी होऊ नये यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी तब्बल दोन तास कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. पोलीस ठाण्यातच दोन्ही गटातील वाद मिटविण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दोन्ही स्थानिक गट एकमेकांविरूध्द आक्रमक असल्याने अखेर पोलिसांना गुन्ह्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागली.
याप्रकाराने कल्याण पूर्वेत तणावाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी माध्यमांना सांगितले, आकाश जयस्वाल हा स्थानिक माजी नगरसेवकाचा माणूस आहे. निवडणुकीतील पराभव पचवता न आल्याने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर हल्ला हा करण्यात आला आहे. निवडणूक झाल्यापासून आपणास हा त्रास देण्यात येत आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी.
