कल्याण – कल्याण पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या शिवाजी चौकात संध्याकाळच्या वेळेत वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने आपली खासगी मोटार उभी करणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील एका कर्मचाऱ्याला कल्याणच्या वाहतूक विभागाने विनावाहनतळाच्या (नो पार्किंग) जागेत वाहन उभे केले म्हणून एक हजार रूपयांचा ई चलान पध्दतीने दंड ठोठावला आहे.

या कर्मचाऱ्याने आपल्या वाहनाच्या दर्शनी भागात कल्याण डोंबिवली महानगरपालिका अशी नामपट्टी ठेवली होती. पालिका अधिकाऱ्याची ही गाडी आहे. त्यामुळे या वाहनावर वाहतूक पोलीस कारवाई करणार नाहीत, असा या कर्मचाऱ्याचा विचार होता. शिवाजी चौकात मुख्य वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला मोटार उभी करून इतर वाहनांना, पादचाऱ्यांना अडथळा केला म्हणून वाहतूक विभागाने ही कारवाई केली.

या बेशिस्तीने उभे केलेल्या वाहनाविषयी संतप्त नागरिकांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही या वाहन मालकावर कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या होत्या. हा विषय विनावाहनतळ भागात वाहन उभे केल्याचा असल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी हा विषय कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांच्याकडे पाठवला होता.

शिवाजी चौकात मोटार

शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान वाहन, पादचारी यांची वर्दळीची वेळ असताना एक मोटार शिवाजी चौकात रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली. या मोटारीचा वाहन क्रमांक एमएच ०५ एफपी ५७०८ होता. मोटार रस्त्याच्या कडेला उभी केल्यानंंतर वाहन मालक किंवा या मोटारीचा चालक बाजुच्या दुकानात किंवा अन्य ठिकाणी खरेदी, मंदिरात दर्शनासाठी गेला. या कालावधीत या मोटारीच्या बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या. बस अडकून पडल्या.

मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हे वाहन उभे केल्याने वाहन चालकांना या भागातून वाहन नेणे अवघड झाले. पादचाऱ्यांना चालणे मुश्किल झाले. या मोटारीच्या दर्शनी भागात कल्याण डोंबिवली महानगरपालिका असे लिहिले होते. त्यामुळे पालिका अधिकाऱ्याचे हे वाहन असल्याने संतप्त पादचाऱ्यांनी त्या अधिकारी, कर्मचाऱ्याला आजुबाजुच्या दुकानात शोधण्याचा प्रयत्न केला. पण ते तेथे आढळले नाहीत.

अखेर गुरूदेव हाॅटेल चौकात गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलिसाला या बेशिस्तीने उभ्या केलेल्या या मोटारीची माहिती देण्यात आली. वाहनतळ नसलेल्या आणि मुख्य वर्दळीच्या शिवाजी चौकात हे वाहन उभे केले म्हणून वाहतूक हवालदाराने या मोटारीच्या वाहन मालकाला ई चलान पध्दतीने एक हजार रूपयांचा दंड ठोठावला. वाहतूक पोलिसाच्या ई चलान यंत्रावर या वाहन मालकाचे नाव संजय मनोहर जाधव असे दिसून आले. त्यामुळे या पालिका कर्मचाऱ्याची ही मोटार असल्याचे स्पष्ट झाले.

या मोटारीभोवती अनेक पादचारी, काही वाहन चालक उभे होते. त्यावेळी या वाहनाचा मालक, चालक तेथे आल्यावर पादचाऱ्यांनी त्यांना वाहन रस्त्यात उभे केले म्हणून फैलावर घेतले.