कल्याण – किडणी विकाराने व्याधीग्रस्त झालेल्या कल्याणमधील रामबाग भागातील एका ज्येष्ठ कबड्डीकबडीपटूला उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याणमधील रामबाग शिवसेना शाखेने वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रूपयांचा धनादेश दिला. मागील अनेक वर्ष सामाजिक कार्यात नेहमीच अग्रसेर असलेल्या या शाखेचे प्रमुख आणि ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी गरजू, पीडित, दुर्बल घटकातील शाळकरी मुलांना नेहमीच अर्थसाहाय्य करतात.
आता आपला सहकारीच किडणी विकाराने व्याधीग्रस्त असल्याचे समजल्यावर उपनेते साळवी यांनी आपल्या सहकाऱ्याला ५० हजार रूपयांची तातडीने मदत केली. मंगेश नेटावटे हे कल्याणमधील रामबाग शिवसेना शाखेचे निष्ठावंत शिवसैनिक आणि ज्येष्ठ कबड्डीपटू आहेत. ओम कबड्डी संघातून ते विविध स्तरावर खेळत असतात. मागील काही दिवसांपासून मंगेश यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांनी डाॅक्टरांकडून वैद्यकीय तपासण्या करून घेतल्या. त्यांना किडणीचा विकार असल्याचे निदान झाले. कल्याणमधील मीरा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
या रूग्णालयाने मंगेश यांना देयक शुल्कासाठी सहकार्य केले. राज्य, राष्ट्रीयस्तरावर कबड्डी खेळणारा एक ज्येष्ठ कबड्डीपटू कायम बिछान्याला खिळून राहणे कबड्डी संघ आणि मंगेश नेतृत्व करत असलेल्या संघाला, त्यांच्या सहकाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे उपनेते विजय साळवी यांनी मंगेश यांची प्रकृती उत्तम राहील यासाठी त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रूपयांचा धनादेश रामबाग शिवसेना शाखा शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून दिला. मंगेश यांनी लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा शिवसेना शाखेत आणि आपल्या कबड्डी संघात सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा शिवसैनिकांनी व्यक्त केली.
मंगेश यांना डायलिसिस करावे लागणार आहे. यासाठी त्यांना पैशाची गरज भासणार आहे. मंगेशच्या एकूण कौटुंबिक आर्थिक परिस्थितीचा विचार करून मंगेश यांच्यावर वैद्यकीय उपचाराचा अधिकचा भार पडू नये याविचारातून शिवसेना रामबाग शिवसेना शाखेने त्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी पाऊल उचलले. रामबाग शिवसेना शाखेचे ज्येष्ठ पदाधिकारी विजय साळवी आणि इतर पदाधिकाऱ्यांतच्या उपस्थितीत हा धनादेश मंगेश यांना हस्तांतरित करण्यात आला. त्यांना आवश्यक काही वैद्यकीय साहाय्यासाठी काही गरज लागली तर त्यासाठीही सहकार्य करण्याचे आश्वासन शिवसैनिकांनी दिले.
मागील अनेक वर्ष रामबाग शिवसेना शाखा सामाजिक बांधिकली जपत समाजातील दुर्बल घटक, गरजू, दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थी, पीडित, रुग्ण, आदिवासी भागातील नागरिकांचे आरोग्य, विद्यार्थी यांना आपल्या क्षमतेप्रमाणे आवश्यक ते अर्थसाहाय्य करते. वर्षभरातील हिंदू धर्माचे सण, उत्सव या शाखेतर्फे दणक्यात साजरे केले जातात. वेळीच अर्थसाहाय्य मिळाल्याने मंगेश नेटवटे यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
