कल्याण – मागील काही महिन्यांपासून शांत असलेले कल्याण पश्चिमेतील लालचौकी रिक्षा वाहनतळांवरील रिक्षा चालक पुन्हा मनमानी करून प्रवाशांना त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. हे रिक्षा चालक लालचौकी येथील भाडे नाकरून फक्त आधारवाडी भागातील श्री काॅम्पलेक्स गृहसंकुल भागातील प्रवासी घेण्यास सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे लालचौकी येथे जाणाऱ्या प्रवाशांना १५ ते २० मिनिटे लालचौकी रिक्षा वाहनतळावर रखडावे लागते.
लालचौकीपेक्षा श्री काॅम्पलेक्सचे भाडे अधिक असल्याने लालचौकी रिक्षा वाहनतळावरील प्रवासी भाडे घेण्यापेक्षा श्री काॅम्पलेक्स येथे जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षा चालक सर्वाधिक प्राधान्य देतात. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक येथून शिवाजी चौकमार्गे सहजानंद चौक लालचौकी ते आधारवाडी श्री काॅम्पलेक्स असा सरळ मार्ग आहे. त्यामुळे रिक्षा चालक या रस्त्यावरील कोणताही प्रवासी घेऊ शकतात. परंतु, मधले प्रवासी भरले की भाडे कमी मिळते, असा विचार करून लालचौकी रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालक श्री काॅम्पलेक्स नावाने ओरडून प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करतात, असे प्रवाशांनी सांगितले.
श्री काॅम्पलेक्सच्या अगोदर लालचौकी येते. त्यामुळे तुम्ही आम्हाला पण रिक्षेत घ्या. श्री काॅम्पलेक्सचे भाडे मिळाले तर त्यांनाही घेऊन शेअर रिक्षेने प्रवासी वाहतूक करा, अशा सूचना अनेक प्रवासी दररोज लालचौकी रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालकांना करतात. रिक्षा चालक लालचौकी रिक्षांकडे पाहत तर नाहीत, पण त्यांचे म्हणणेही ऐकून घेत नाहीत, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.
लालचौकी परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, खासगी आस्थापना आहेत. रेल्वे स्थानकापासून पायी अर्धा तासाचा हा प्रवास आहे. रिक्षेने याठिकाणी प्रवासी १० ते १५ मिनिटात पोहचतो. सकाळच्या वेळेत कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचण्याची प्रत्येक नोकरदाराची घाई असते. विशेष करून महिला प्रवासीही यामध्ये असतात. लोकलमधून उतरून लालचौकी रिक्षा वाहनतळावर आले की लालचौकी भाडे विचारले की रिक्षा चालक पाठीमागील रिक्षेकडे बोट दाखवून तिकडे जाण्याची सूचना करतो. पाठीमागील रिक्षा चालक नकारात्म मान हलवून मागील रिक्षेकडे जाण्याची सूचना प्रवाशाला करतो. अशाप्रकारे चार ते पाच रिक्षा चालक लालचौकीचे भाडे प्रवाशांच्या तोंडावर नाकरतात. याचवेळी श्री काॅम्पलेक्सकडे जाणारा एक प्रवासी आला तरी रिक्षा चालक तातडीने आपल्या रिक्षेत बसवून या काॅम्पलेक्सकडे जाणाऱ्या इतर तीन प्रवाशांची वाट पाहत बसतात. परंतु, रिक्षा चालक लालचौकीचा प्रवासी रिक्षेत घेत नाहीत. दररोज १० ते १५ मिनिटे लालचौकी रिक्षा थांब्यावर रिक्षेसाठी रखडावे लागते. या रिक्षा चालकांचे हे रोजचे नाटक सुरू असल्याने वाहतूक आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक सकाळ, संध्याकाळच्या वेळेत कल्याण पश्चिमेतील लालचौकी रिक्षा वाहनतळावर येऊन लालचौकी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
संध्याकाळच्या वेळेत कामावरून परतणाऱ्या प्रवाशांनाही लालचौकी रिक्षा वाहनतळावर १५ मिनिटाची रखडपट्टी करून मगच रिक्षा मिळते. मागील काही महिन्यापूर्वी वाहतूक, आरटीओ अधिकाऱ्यांनी या मनमानी करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केली होती.
रिक्षा वाहनतळावर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला त्याच्या मागणीप्रमाणे रिक्षा चालकाने इच्छित ठिकाणी सोडले पाहिजे. जे रिक्षा चालक भाडे नाकारत असतील तर त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई आरटीओ विभागाने करावी. अशा रिक्षा चालकांची आम्ही अजिबात पाठराखण करत नाही.संतोष नवले कार्याध्यक्ष, कल्याण शहर रिक्षा चालक मालक असोसिएशन.
