कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेकडून या भटक्या कुत्र्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. कल्याण जवळील मोहने गाळेगाव भागात गुरुवारी भटक्याने कुत्र्याने खुशील शंकर वाघे या सात वर्षाच्या बालकावर हल्ला करून त्याला जखमी केले. हा हल्ला इतका आक्रमक होता की उपचार सुरू असताना या बालकाचा मृत्यू झाला.
खुशील हा मोहने गाळेगाव भागातील कातकरी वाडीत आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. त्याचे आई वडील कष्टकरी आहेत. घराच्या परिसरात फिरत असताना खुशीलवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याच भागातील अन्य एका बालकाला या भटक्या कुत्र्याने चावा घेऊन त्याला जखमी केले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहने, गाळेगाव, जेतवननगर, तिपन्नानगर, उंभार्णी, मोहिली, आर. एस. टेकडी भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नागरिकांना दिवसा या भागातून येजा करणे शक्य होत
नाही. रात्रीच्या वेळेत ही भटकी कुत्री पादचाऱ्यांचा पाठलाग करतात. अनेक वेळा दुचाकी स्वार, रिक्षांचा पाठलाग करून त्यामधील प्रवाशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच ठाकरे गटाच्या स्थानिक नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी पालिकेत जाऊन आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. आणि मोहने, गाळेगाव, उंभार्णी परिसरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
भटक्या कुत्र्यांवर वेळीच निर्बिजीकरण, लसीकरण पालिकेकडून केले जात नाही. त्यामुळे हे प्रकार वाढत असल्याचे नगरसेविका गायकवाड यांनी सांगितले. पालिकेचे श्वान निर्बिजीकरण केंद्रावर पूर्ण क्षमतेने काम करील असा कर्मचारी वर्ग नाही. यापूर्वीच्या कर्मचाऱ्यांनी या केंद्राच्या माध्यमातून गैरव्यवहार केले आहेत. त्यामुळे तो निलंबित झाला आहे. आता नवीन कर्मचारी या केंद्रात नियुक्त केला आहे. आरोग्य विभागप्रमुखांचे या केंद्रावर प्रभावी नियंत्रण नाही, अशा श्वान प्रेमींच्या तक्रारी आहेत.
पालिका हद्दीसाठी एकच श्वान निर्बिजीकरण केंद्र कल्याणमधील पत्रीपुलाजवळील जागेत आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी डोंबिवलीत अशा प्रकारचे श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याची घोषणा पालिकेने अर्थसंकल्पात केली आहे. पण ही फक्त घोषणाच राहिली आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी पालिका आरोग्य विभागाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेने आरोग्य विभागासाठी शासन सेवेतील एक वैद्यकीय आरोग्य अधिकारी देण्याची नागरिकांची मागणी आहे.
पालिका हद्दीतील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या विषयावर सर्व पक्षीय नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राचे वाहन शहरात फिरत नाही. या केंद्राची वाहने अनेक वेळा बंद अवस्थेत असतात. नागरिकांनी संपर्क केला की खोटी उत्तरे देऊन नागरिकांना गप्प केले जाते. आयुक्तांनी श्वान निर्बिजीकरण केंद्रासाठी सक्षम यंत्रणा उभारावी आणि त्यांच्यावर या केंद्राची जबाबदारी टाकण्याची नागरिकांची मागणी आहे.
खुशील वाघ
