कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर विजयी झाल्याचे समजताच उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक १३ ड मधील नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश पाटील यांच्या उपस्थितीत खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची तात्काळ भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ही सदिच्छा भेट असल्याचे सुरूवातीला सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून प्रभाग क्रमांक १३ अ मधील ठाकरे गटाच्या नगरसेविका ॲड. कीर्ति राजन ढोणे आणि मधुर म्हात्रे आपले मोबाईल बंद करून बेपत्ता असल्याचे उघड झाले होते. सोळा दिवसानंतर मधुर म्हात्रे कल्याणमधील आपल्या घरी परतले.

मधुर म्हात्रे यांनी आपण ठाकरे गटातच राहणार की शिवसेना शिंदे गटाला सभागृहात पाठिंबा देणार याविषयी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. ॲड. ढोणे, मधुर म्हात्रे यांच्यानंतर पाठोपाठ ठाकरे गटाचे स्वप्नाली केणे, राहुल कोट हे नगरसेवक बेपत्ता झाले. शिवसेना शिंदे गटाच्या शिलेदारांनी त्यांना आपल्या रखवालीत ठेवल्याची माहिती मिळाल्यावर ठाकरे गटाच्या कल्याण, डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांचा मुरबाड, कर्जत, नाशिक, शहापूर, भिवंडी परिसरात शोध घेतला. ते कोठेही आढळले नाहीत.

ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या नऊ नगरसेवकांपैकी पाच नगरसेवकांच्या गटाची नोंदणी कोकणभवन येथे करण्यात आली आहे. गेल्या सोळा दिवसांपासून ठाकरे गटाच्या पक्ष नेते, पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात न राहिल्याने ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, शहरप्रमुख बाळा परब यांनी या बेपत्ता नगरसेवकांच्या घरी आवश्यक त्या नोटिसा देऊन त्यांना पक्ष पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे कळविले आहे. त्यांच्या घराला नोटिसा लावण्यात आल्या आहेत. मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी मधुर हे देवदर्शनासाठी गेले आहेत. ते लवकरच घरी येतील असे माध्यमांना सांगितले होते.

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नावाने आणि चिन्हावर निवडून येऊन नंतर पक्ष आणि मतदारांशी प्रतारणा करून हे चारही नगरसेवक बेपत्ता झाल्याने ठाकरे गटाच्या कल्याणमधील पदाधिकारी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या चारही नगरसेवकांना अपात्र करून त्यांच्या प्रभागात पोटनिवडणुका घेण्याची तयारी ठाकरे गटाच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी सुुरू केली आहे. आता मधुर म्हात्रे परत आले आहेत. त्यांची भूमिका काय आहे. ते जाणून घेऊन आम्ही पुढील भूमिका घेऊ, असे ठाकरे गटाच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मधुर म्हात्रे घरी येत असल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी प्रभागातून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. घरी त्याचे औक्षण करण्यात आले. महापौर निवडीच्या दोन दिवस अगोदर मधुर म्हात्रे घरी परतले आहेत. इतर तीन नगरसेवक अशाच पध्दतीने परत येतात की महापौर निवडीच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांसोबत थेट पालिका सभागृहात दाखल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.