कल्याण – दिल्लीत जंतरमंतरवरील विद्यार्थी लाठी हल्ला प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरूवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण विभागातर्फे शिवाजी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. मुख्य वर्दळीच्या शिवाजी चौकात हे आंदोलन करण्यात आले. वाहनांचा रस्ता बंद झाल्याने कोंडी झाली. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळला. आंंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करून त्यांना पोलीस ठाण्यात नेले.

ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे कार्यकर्ते, महिला संघटना, विद्यार्थी संघटना या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी नीट पेपरफुटी प्रकरणी न्याय मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी संयमितपणे आंदोलन सुरू केले असताना त्यांच्यावर दिल्ली पोलीस लाठी हल्ला करून विद्यार्थ्यांना गंभीर जखमी करतात.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक २३ दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तर केंद्र सरकारातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांची दखल घेत नाहीत. त्यांची भेट टाळत आहेत. पंतप्रधान आपणास भेटत नाहीत म्हणून विद्यार्थी संसद दिशेने जातात तर त्यांचे रस्ते अडवून त्यांच्यावर लाठी हल्ला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना जायबंदी केले जाते. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या हल्लेखोर सरकारचा निषेध करण्यासाठी आपण हे आंदोलन केले, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी माध्यमांना दिली.

शिवाजी चौकात आंदोलनकर्ते धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतिकात्मक पुतळा घेऊन आले. तेथे केंद्र सरकारचा मोठ्याने घोषणा देऊन निषेध करण्यात आला. पंतप्रधान, गृहमंत्री हाय हाय करत निषेध करत टाळ्या वाजविण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शिवाजी चौकातून हटविण्याचा प्रयत्न केला. पण उपनेते साळवी यांनी रस्त्यात बैठक मारली. त्यांच्या बरोबर इतरही कार्यकर्ते रस्त्यावर बसले. त्यामुळे शिवाजी चौकातील सर्व रस्ते अडले गेल्याने वाहन कोंडी झाली. आंदोलनकर्ते आक्रमक होऊन केंद्र सरकारचा निषेध करू लागले. यावेळी प्रधान यांचा पुतळा जाळण्यात आला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक कार्यकर्ते पोलिसांना दाद देत नव्हते. उपनेते साळवी आणि कार्यकर्ते रस्त्यावरून हटण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून बंड्या साळवींसह एकेक कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन त्यांना पोलीस पिंजऱ्यातून पोलीस ठाण्यात नेले. या आंदोलनामुळे कल्याण शहरात वाहन कोंडी झाली.

पालिकेत गोंधळ

पालिकेच्या महासभेत गुरूवारी मनसे, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी महासभा सुरू होताच, सभागृहात झेंडे हातात घेत दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थी हल्ल्याचा निषेध करत महासभा तहकूब करण्याची मागणी केली. मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, नगरसेविका डाॅ. रसिका पाटील, ठाकरे गटाचे नगरसेवक उमेश बोरगावकर, काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी सभा तहकुबीसाठी आक्रमक होते. विद्यार्थ्यांवर हल्ला करून केंद्र सरकार दडपशाही, हुकुमशाही राबवत आहे. त्याचा निषेध यावेळी करण्यात आला. या नगरसेवकांच्या आक्रमतेमुळे सभेत काही वेळ गोंधळ उडाला.