कल्याण – ठाणे जिल्हा परिषदेच्या कल्याण तालुक्यात १०० हून अधिक शाळा आहेत. या शाळांची मागील अनेक वर्ष देखभाल दुरुस्ती न झाल्याने या शाळा आता पावसाळ्यात गळू लागल्या आहेत. अनेक शाळांना बाह्य बाजुने रंगरंगोटी केली गेली नसल्याने या शाळांची पडिक घरासारखी अवस्था झाली आहे. मराठी शाळा वाचवा, जिल्हा परिषदेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवा यादृष्टीने विविध अभियाने शासनस्तरावर, अनेक स्वयंसेवी संस्था राबवित असताना जिल्हा परिषदेच्या कल्याण तालुक्यातील शाळांची दुरावस्था झाल्याने विद्यार्थी, पालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
कल्याण-मुरबाड ते माळशेज घाट महामार्गावर ठाणे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा रस्त्यालगत आहेत. या शाळांच्या इमारती पाहून प्रवासीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना या शाळांच्या दुरवस्थेविषयी जाब विचारण्यास लोकप्रतिनिधी नसल्याने ही परिस्थिती शाळांची झाली आहे, असे जिल्हा परिषदेच्या काही माजी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
छपरे तुटली
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांना एप्रिल, मे महिन्यात सुट्ट्या लागल्या की यापूर्वी जिल्हा प्रशासन आपल्या अखत्यारितील शाळांची देखभाल, दुरुस्तीची कामे काढून जूनमध्ये शाळा सुूरू होण्यापूर्वी या शाळा सुस्थितीत केल्या जात होत्या. मागील काही वर्षापासून या गोष्टींचा विसर अधिकाऱ्यांना पडला आहे. शहरी शाळेत विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण शाळांमध्येही विद्यार्थीच शिक्षण घेतात. अनेक उपक्रमशील शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहेत. तरीही या शाळा सुस्थितीत ठेवण्यास प्रशासन चालढकलपणा का करत आहे, असे प्रश्न पालक करत आहेत.
पावसाळा सुरू झाल्याने कल्याण तालुक्यातील अनेक शाळांच्या छपरांवरील कौले फुटली आहेत. खिडक्यांची फडताळे तुटली आहेत. काही शाळांना प्रवेशव्दावर, संरक्षित भिंत नसल्याने गाव परिसरातील गाई, बैल, भटकी जनावरे शाळांच्या व्हरांड्यात येऊन बसत आहेत. सकाळीच शाळेत येणाऱ्या शिक्षक, मुलांना शेण बाजुला करून, व्हरांडा स्वच्छ करून मग शाळा सुरू करावी लागत असल्याचे चित्र कल्याण तालुक्यातील अनेक शाळांमध्ये आहे.
अधिकाऱ्यांचा फेरफटका
जिल्हा परिषद शाळांची काय अवस्था झाली आहे हे पाहण्यासाठी वातानुकूलित दालन सोडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस कल्याण तालुक्यात दौरा करावा, अशी मागणी कल्याण तालुक्यातील गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कल्याण तालुक्यातील वासुंद्री, केळणी, पिसवली, म्हारळपाडा जिल्हा परिषद शाळांमध्ये पावसाचे पाणी वर्गात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आडोसा घेऊन बसावे लागते.
गुरवली, आपटी, रोहन, दहागाव, वाहोली, गोवेली, बापसई, दावडी, पागड्याचा पाडा, निंबवली, म्हारळपाडा शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने एका वर्गात दोन वर्ग भरवून शिक्षकांना वेळ निभावून न्यायी लागते, असे ग्रामस्थ सांगतात. विद्यार्थी पटसंख्येनुसार कल्याण तालुक्यात २८२ शिक्षक कमी आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना शिकविण्याचा पध्दतीवर होतो.
काही शाळांचा पट मोठा पण तेथे एक ते दोन शिक्षक, शाळेत फळा, खुर्ची, शैक्षणिक साधनांचा अभाव त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे काय, असे प्रश्न शिक्षकांना पडत आहेत. याविषयी शिक्षक संघटनाही ही आक्रमक भूमिका घेत नसल्याने शिक्षक गुपचिळी धरून आहेत. कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत. विद्यार्थी पटसंख्येप्रमाणे आवश्यक शिक्षक मिळावेत यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. सुनीता मोटघरे गट शिक्षणाधिकारी .
