कल्याण – टिटवाळा बल्याणी परिसरात बेकायदा चाळींची उभारणी झालेल्या जमिनीची मालकी मुंबई पोलीस दलातील एका चकमकफेम पोलीस अधिकाऱ्याच्या नातेवाईकाची असल्याची जोरदार टिटवाळा, मांडा भागात सुरू आहे. हा पोलीस अधिकारी विविध कारणांमुळे नेहमीच वाद आणि चर्चेच्या भोवऱ्यात राहिला आहे.

स्थानिक रहिवासीही ही जमीन एका पोलीस अधिकाऱ्याची असल्याची माहिती देत आहेत. टिटवाळा, मांडा भागातील सरकारी, वन विभागाच्या जमिनीवरील बहुतांशी चाळी महसूल, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी जमीनदोस्त केल्या आहेत. तरीही मोकळ्या जमिनीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळी कशा होतात. याची चर्चा आता सुरू झाली आहे. या चर्चेतून एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव पुढे येत आहे.

मुंबई पोलीस दलात असताना हा अधिकारी गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जात होता. काही कारणांमुळे तो वाद्ग्रग्रस्त ठरला होता. या अधिकाऱ्याने पोलीस दलात असताना टिटवाळा बल्याणी परिसरात आपल्या नातेवाईकाच्या नावाने काही वर्षापूर्वी पडिक जमीन खरेदी करून ठेवली होती. ही जमीन त्यावेळी विकसित केली असती तर ती शासनाच्या, तपास यंत्रणांच्या नजरेस आली असती.

त्यामुळे ही जमीन आहे त्या स्थितीत ठेवणे या अधिकाऱ्याने पसंत केले असल्याचे समजते. आता ही जमीन गृह प्रकल्पासाठी देऊन विकसित केली तर या पोलीस अधिकारी आणि त्याच्या नातेवाईकाचे नाव बांधकाम मंजुऱ्या, विविध प्रकारच्या शासकीय कागदपत्रांवर पुढे येणार आहे. त्यामुळे ही जोखीम टाळण्यासाठी टिटवाळा परिसरातील जमीन या अधिकाऱ्याने पडिक म्हणून ठेवणे पसंत केल्याचे समजते. त्यावेळी नाममात्र जमीन भावाने घेतलेल्या या जमिनीची बाजारभावाने आता किंमत कोटीच्या घरात आहे.

या जमिनीवर अधिकार दाखवला तर पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहे ती जमीन पडिक ठेवण्यात हा अधिकारी धन्यता मानत असल्याचे समजते. पालिका अधिकाऱ्यांनीही या बेकायदा चाळी उभारणाऱ्या जमीन मालकांचा शोध सुरू केला होता. त्यावेळी त्यांच्या या भागातील काही जमीन ही एका पोलीस अधिकाऱ्याच्या नावावर असल्याचे निदर्शनास आले होते. या जमिनीवर कोणीही अधिकार दाखवत नसल्याने भूमाफिया या जमिनीवर तात्पुरता हक्क दाखवून तेथे बेकायदा चाळी उभारत आहेत.

या बेकायदा चाळींमधील घरे अल्प किमतीत घर खरेदीदारांना विक्री करून पळून जात आहेत. पालिकेने तोडकामाची कारवाई केली तरी या भागात घर विक्री करणारा भूमाफिया थांबत नाही. त्यामुळे घर खरेदीदार बेघर होतो आणि घर तुटल्याने त्याचे आर्थिक नुकसान होते. या पोलीस अधिकाऱ्याने या जमिनाचा ताबा घेऊन त्याला संरक्षित कुंपण टाकून जमीन बंदिस्त करण्याची मागणी स्थानिक काही नागरिक करत आहेत. पालिका अधिकारीही या मोकळ्या जमिनीमुळे भूमाफियांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्रस्त आहेत.

डोंबिवलीतील अनेक बेकायदा इमारतींमध्ये काही सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा दौलतजादा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही पोलीस अधिकारी हा परिसर सोडून जाण्यास तयार होत नाहीत असे समजते.