कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या टिटवाळा अ प्रभागात मागील सहा महिन्यांपासून बेसुमार बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची कामे सुरू आहेत. ही बेकायदा बांधकामे रोखण्यात विद्यमान अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अ प्रभागात सक्षम कर्तव्य कठोरपणे काम करणारा साहाय्यक आयुक्त तातडीने नियुक्त करावा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोहने कोळीवाडा प्रभागाचे नगरसेवक राहुल कोट यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
टिटवाळा, बल्याणी, बनेली, वासुंद्री, वडवली परिसरात मोकळ्या जागा हडप करून, झाडे तोडून, सरकारी, वन जमिनी हडप करून भूमाफिया दिवसरात्र कामे करून बेकायदा चाळींची बांधकामे करत आहेत. या बांधकामांना पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून चोरून नळजोडणी घेऊन नागरिकांचे पिण्याचे पाणी बेकायदा बांधकामासाठी वापरले जाते. अ प्रभाग हद्दीत बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे राजरोस सुरू असुनही अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी या बेकायदा बांधकामांवर तोडकामाची कारवाई करत नाहीत. याऊलट या बेकायदा बांधकामांना फक्त नोटिसा देतात आणि ती बांधकामे पूर्ण होण्यास साहाय्य करत आहेत, असे नगरसेवक कोट यांनी तक्रारीत म्हटले आहे.
बेकायदा बांधकामे तोडली हे वरिष्ठांना दाखविण्यासाठी साहाय्यक आयुक्त चौधरी बेकायदा चाळींच्या ऐवजी फक्त चाळी उभारणीसाठी बांधलेली जोती तोडून मोठी कारवाई केल्याचा देखावा उभा करत आहेत. या माध्यमातून साहाय्यक आयुक्त वरिष्ठ आणि तक्रारदारांची दिशाभूल करत आहेत. अ प्रभाग अधिकाऱ्यांचा भूमाफियांना आशीर्वाद असल्याने ते ही बेकायदा बांधकामे करण्याचे धाडस करत आहेत, असे नगरसेवकाने सांगितले.
मागील दोन वर्षाच्या काळात अ प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी अ प्रभाग हद्दीत एकही बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची विशेष खबरदारी घेतली होती. भूमाफियांचे त्यांनी कंबरडे मोडले होते. अ प्रभाग कार्यालय परिसरात एकही भूमाफिया दिसणार नाही याची दक्षता तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी घेतली होती. आता भूमाफिया अ प्रभाग कार्यालया भोवती तळ ठोकून असल्याच्या तक्रारी आहेत. भूमाफिया, बेकायदा बांधकामांवर अ प्रभाग साहाय्यक आयुक्त चौधरी यांचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे या प्रभागात सक्षम साहाय्यक आयुक्त तातडीने नियुक्त करावा, अशी मागणी नगरसेवकाने केली आहे.
तर, साहाय्यक आयुक्त चौधरी यांनी प्राप्त तक्रारींप्रमाणे आपण तात्काळ बेकायदा बांधकामांवर कारवाई करत आहोत. ही कारवाई नियमित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
फेरीवाल्यांचा उच्छाद
टिटवाळा, मोहने, आंबिवली, बल्याणी परिसरात आठवडी बाजार भरत आहेत. टिटवाळा रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. रस्तोरस्ती, पदपथ अडवून फेरीवाले बसत आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे, चालकांना वाहन चालणे अवघड झाले आहे, असे नगरसेवकाने तक्रारीत म्हटले आहे. विद्यमान साहाय्यक आयुक्त यांची पालिकेतील सेवा लेखा विभागात गेली आहे. प्रभागातील कामकाजाची जाणीव नसल्याने अ प्रभागात गोंधळ उडाला असल्याची चर्चा आहे.
